एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाला परवानगी नाही
#पुणे
मुख्य परीक्षेसंदर्भात आंदोलन करू पाहणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे कारण पुढे करीत पोलिसांनी हा निर्णय घेतला.
महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगातर्फे यंदाच्या वर्षीपासून मुख्य परीक्षा वैकल्पिक न घेता वर्णनात्मक घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, सदरचा पॅटर्न दाेन वर्षांनंतर २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी पुण्यातील अलका टाॅकीज चाैकात वेळाेवेळी आंदाेलने विद्यार्थ्यांनी केली. परंतु त्यात त्यांना अद्याप यश आले नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अलका चाैकात शुक्रवारी आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. परंतु पाेलिसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे कारण देत आंदाेलनास परवानगी नाकारली आहे.
याबाबत आंदाेलनाचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बळीराम डाेळे म्हणाले, ‘‘परीक्षा पद्धती बदलास विद्यार्थ्यांचा विराेध नाही. केवळ सात ते आठ महिन्यात त्यांचा परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण हाेणे अशक्य असल्याने त्यांनी चांगल्याप्रकारे अभ्यास हाेण्यासाठी वेळ मागितला आहे.’’
‘‘एमपीएससीची स्वायत्त भाषा बाेलणाऱ्यांनी अभ्यासक्रम बदलाची शिफारस एका समितीकडून झाल्याचे लक्षात घ्यावे. १२५० गुणांची मुख्य परीक्षा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अत्यल्प काळ मिळणे चुकीचे आहे. क्लासचालकांच्या दबावास बळी पडून काही विद्यार्थी यंदाच्या वर्षीपासूनच अभ्यासक्रम लागू करण्याची मागणी करत आहेत. भाजपचे नेते आमदार गाेपीचंद पडळकर, खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी विद्यार्थ्यांचा खेळ मांडला आहे,’’असेही बळीराम डोळे म्हणाले.
एमपीएससीच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार तयारी केलेला विद्यार्थी चेतन वाग्ज म्हणाला, ‘‘नवीन अभ्यासक्रमानुसार आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. भावी अधिकारी घडण्यासाठी परीक्षेची वर्णनात्मक पध्दतच याेग्य आहे. त्यामुळे तत्काळ नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा वेळेत घेणे महत्त्वाचे आहे.’
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.