आयुष्मान आता युनिसेफचा ॲम्बॅसिडर
अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा आयुष्मान खुराना याची युनिसेफने भारताचा ॲम्बॅसिडर म्हणून नेमणूक केली आहे. प्रत्येक बालकाला जगण्याचा, रक्षणाचा, प्रगतीचा हक्क असून त्याची सर्व समाजाला जाणीव व्हावी. बालकांचे प्रश्न, समस्या, त्यांना ज्या स्थितीतून जगावे लागते ती स्थिती याकडे लक्ष वेधून त्यावर समस्या सोडवण्याच्या प्रकियेला गती देणे यासाठी ॲम्बॅसिडर काम करत असतात.
बालकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी युनिसेफच्या कार्याला हातभार लागावा या उद्देशाने ही जबाबदारी आपण स्वीकारल्याचे आयुष्मानने सांगितले. या वृत्ताची पुष्टी करताना आयुष्मान म्हणतो की, बालकांच्या हक्कांसाठी युनिसेफच्या मदतीने काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. देशातील मुलांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात माझा हातभार लागत असेल तर मला आनंदच होईल.
या नव्या भूमिकेत काम करताना मुलांचा एक समर्थ आवाज बनू शकलो आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्यात मी काही मदत करू शकलो तर त्यासारखी दुसरी समाधानाची गोष्ट नसेल. २०२२ च्या जागतिक बालदिनाच्या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरच्या समवेत आयुष्मान सहभागी झाला होता. युनिसेफचे ॲम्बॅसिडरपद स्वीकारून आयुष्मान खुरानाने आपल्याला सामाजिक भान असल्याचे दाखवून दिले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.