सर्व प्रश्न सोडवणार : शिंदे

पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर माफीचा आदेश लवकरच काढला जाईल. अनधिकृत बांधकामांसाठी यापुढे मोर्चा काढावा लागणार नाही. तसेच प्राधिकरणाचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषयही सिडकोप्रमाणे तातडीने मार्गी लावणार आहे. पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 24 Feb 2023
  • 07:50 am
सर्व प्रश्न सोडवणार : शिंदे

सर्व प्रश्न सोडवणार : शिंदे

शास्तीकर माफी, अनधिकृत बांधकाम, निगडीपर्यंत मेट्रो विस्ताराची ग्वाही

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर माफीचा आदेश लवकरच काढला जाईल. अनधिकृत बांधकामांसाठी यापुढे मोर्चा काढावा लागणार नाही. तसेच प्राधिकरणाचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषयही सिडकोप्रमाणे तातडीने मार्गी लावणार आहे. पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. या शहरातील एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही ही जबाबदारी माझी असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (२२ फेब्रुवारी) केली. माझ्या मुख्यमंत्री होण्यात भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचाही सिंहाचा वाटा होता अशा भावना व्यक्त करून पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणी येथील शिवेंद्र लॉन्समध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्या मुख्यमंत्री होण्यामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा सिंहाचा हिस्सा, सहभाग, होता. दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाहीत. भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन होण्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत आजारी असताना देखील लक्ष्मण जगताप मतदानासाठी मुंबईत आले होते. त्यातून पक्षावरील प्रेम, निष्ठा, जबाबदारी त्यांनी निभावली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर, प्रेम आहे, पण अशी वेळ येईल असे कुणालाही वाटले नव्हते. नियतीसमोर आपण सगळे हतबल असतो. त्यांनी अनेक वर्षे चिंचवड मतदारसंघाची सेवा केली. लोकांना प्रेम दिले. कार्यकर्ते आणि मतदारांना स्वतःचा परिवार समजला. त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप या पोटनिवडणुकीत मतदारांचा आशीर्वाद घ्यायला उभ्या आहेत. ही निवडणूक बिनविरोध होईल असे आम्हाला वाटले होते. मुंबईतल्या पोटनिवडणुकीत अनेक नेत्यांनी आवाहन केले. विनंती केली होती. महाराष्ट्राचीही परंपरा सांगितली होती. स्वतः शरद पवार बोलले. राज ठाकरे यांनीही विनंती केली. मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की निवडणूक लढवायला नको. मतदारसंघातील मतदारांचा कल अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या बाजूने आहे. त्या रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

मोर्चा काढावा लागणार नाही

पिंपरी-चिंचवडमधील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शहरातील बांधकामांना लावण्यात आलेला शास्तीकर माफ करण्याचा निर्णय विधानसभेत घेतला आहे. त्याचा शासन आदेश तातडीने निघेल. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांवर आता मोर्चा काढावा लागणार नाही. हा प्रश्न ठाण्याप्रमाणे कायमचा निकालात काढला जाईल. सिडकोप्रमाणे प्राधिकरणाचा साडेबारा टक्क्याचा विषय तातडीने मार्गी लावला जाईल. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. इंद्रायणी, पवना नदी सुधार प्रकल्प आराखडा तयार करायला सांगितला आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोला मंजुरी देण्याची सूचना केली आहे. पुणे रिंगरोड लवकरच सुरू करू, अशा घोषणा त्यांनी केल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story