गडावरील 'नकोसा' खजिना केला साफ
नितीन गांगर्डे
पुणे शहरात सर्वत्र मोठ्या जल्लोषात डी. जे., ढोलपथकाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन शिवजयंती साजरी केली जात असताना पुण्यातल्या काही युवकांनी सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत वेगळ्या प्रकारे शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा ठेवा जोपासण्याची गरज व्यक्त करत या तरुणांनी सिंहगडावरील प्लॅस्टिकच्या ३७४० आणि मद्याच्या ४२ बाटल्या जमा केल्या आहेत.
शहरात विविध ठिकाणी ढोलताश्यांचा गजर, डीजे, मिरवणुका काढून शिवजयंती साजरी केली जात असताना 'स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान'चे मावळे मात्र दिवसभर सिंहगड स्वच्छतेचे अभियान राबवत होते. या मोहिमेत प्रतिष्ठानच्या १४ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. स्वच्छता करत असताना किल्ल्यावर त्यांनी ३७४० प्लॅस्टिकच्या आणि ४२ मद्याच्या बाटल्या किल्ल्यावरून जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली. कर्वेनगर येथील मंगेश नवघणे यांनी २०१३ साली स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानची स्थापना केली. पवित्र असलेल्या गडकिल्ल्यांवर साचलेल्या कचऱ्याचे ढीग पाहून त्यांनी गडकिल्ल्यांवर स्वच्छ्ता मोहीम राबवायला सुरुवात केली.मित्रमंडळीचा एक ग्रुप बनवला. त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांवर ते नेहमी मोहीम राबवत असतात. त्यांच्यासोबत आरव शिंदे, सुशांत साळवी, स्वहित कळंबटे, स्वराज कळंबटे, सूरज कांबळे, भारत रेणुसे, सुयश सावंत, अनिल कडू, रमेश ढोकळे, नीलेश भगत, अक्षय तेटंबे, अभिजीत शिंदे, मंगेश नवघणे, सागर फाटक, परशुराम धूर्वी, केतन महामुनी, संतोष वरक ही मंडळी असते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या सर्व जाती-धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यासाठी त्यांना अनेक परकीय राजसत्तेविरुद्ध लढाया कराव्या लागल्या. यातून लोककल्याणकारी रयतेचे स्वराज्य निर्माण झाले. आजही त्याची आठवण त्या काळातील साक्षीदार येथील गडकिल्ले करून देतात. ते मराठी माणसांचे प्रेरणास्रोत आहेत. हे गडकिल्ले मिळवण्यासाठी मावळ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. हे गडकिल्ले इथल्या जनतेसाठी मंदिराइतकेच पवित्र आहेत. या गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखणे हेच पुढच्या पिढ्यांचे कर्तव्य असल्याचे 'स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान"चे मंगेश नवघणे यांनी सांगितले.
सिंहगड किल्ल्यावर दररोज अनेक लोक येत असतात. त्यात पुणे शहरातील आणि शहराबाहेरील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. रविवारच्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त लोक येथे भेट देतात. यातील काहीजण किल्ला आपला पवित्र वारसा आहे हे विसरून किल्ल्यावर कचरा करतात. काही महाभाग चक्क येथे मद्यपान करतात आणि रिकाम्या बाटल्या येथेच फेकून देतात. मद्यपान करायला हे किल्ले काय बार नव्हेत की कोणाची खासगी मालमत्ता नाही याचेही भान त्यांना नसते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. सिंहगड किल्ल्यावर प्लॅस्टिकचा कचरा साचणार नाही, यासाठी वनविभागाने पुढाकार घ्यायला हवा. जे पर्यटक बाटली विकत घेतात, किंवा सोबत घेऊन येतात त्यांच्याकडील रिकाम्या बाटल्या जमा करून घ्याव्यात. यामुळे किल्ल्यावर होत असलेल्या अस्वच्छतेला आवर घालता येईल, अशी अपेक्षा प्रतिष्ठानचे स्वयंसेवक रमेश ढोकळे यांनी व्यक्त केली.
सिंहगडावरील प्लॅस्टिक आणि दारूच्या बाटल्यांचा ढीग पाहून, आपल्या मावळ्यांच्या बलिदानाची जाणीव आहे का हा प्रश्न पडतो. जयंतीनिमित्त एका दिवसासाठी शिवभक्त न होता, मिरवणुकीत डी. जे. वर नाचण्यापेक्षा कमीत कमी एक दिवस गडावरील स्वच्छता केली पाहिजे. तरच आपले प्रेरणास्रोत असलेले पवित्र किल्ले स्वच्छ राहतील, असेही ढोकळे म्हणाले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.