पहाटेच्या शपथविधीमुळेच उठली राज्यातील राष्ट्रपती राजवट
सीविक मिरर ब्यूरो
पहाटेच्या शपथविधीप्रकरणी अजित पवारांनी बोलण्याची काय गरज आहे? तो केवळ सरकार बदलायचा प्रयत्न होता. त्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली. त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. २२) पुण्यात करताच गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे, त्यांना पहाटेच्या शपथविधीबाबतच्या घडामोडींबाबत माहिती असल्याचे सूचक मानले जात आहे. यामुळे या मुद्दयावरून आता नव्याने चर्चा रंगत आहे. ‘समझनेवाले को इशारा काफी है,’ असे म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या आपल्याला पहाटेच्या शपथविधीबाबत माहिती असल्याचे मान्य केले आहे. पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती. त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असेही त्यांनी सूचित केले.
२०१९ मध्ये विधानसभा िनवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सर्वांना धक्का देत २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र शरद पवारांनी अत्यंत वेगाने सूत्रे हलवल्यामुळे हे सरकार ७२ तासांत कोसळले. पण शपथविधीचा चमत्कार कसा घडला, हे अजूनही गुलदस्तात आहे. याबाबत सव्वातीन वर्षे लोटल्यानंतर फडणवीस यांनी अलीकडेच गौप्यस्फोट केला. ‘ते अजित पवारांचे बंड नव्हते, तर शरद पवारांशी चर्चा करूनच सारे ठरले होते. पण नंतर या गोष्टी बदलल्या,’ असे फडणवीस म्हणाले. शरद पवारांनी मात्र त्याचे खंडन केले होते. फडणवीस यांनी आताच हा गौप्यस्फोट का केला याची, चर्चा होत असतानाच पवारांनी टाकलेल्या गुगलीमुळे ही चर्चा वेगळ्याच वळणावर गेली आहे.