‘शाही’ स्वागतासाठी हजारो वेठीस
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी पुण्यात दाखल होताच ते जाणार असलेल्या ठिकाणी सुरक्षेमुळे अचानक केलेल्या बदलामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला. रविवारी सकाळी आंबेगाव येथील शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यासाठी सिंहगड कॉलेज ते शिवसृष्टी दरम्यानच्या लेनमधील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे काही लेखी आणि काही तोंडी आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
रविवारचा धंद्याचा दिवस बुडणार असल्याने दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली. या दौऱ्यानिमित्त कधी नव्हे ते कृतिशील झालेल्या अतिक्रमण विभागाने गेले दोन-तीन दिवस भंडावून सोडल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी `सीविक मिरर`शी बोलताना दिली.
पुण्यात होणारी विविध विकासकामे आणि भेटीगाठींच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी पुण्यात दाखल झाले. साधारणतः राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांच्या दौऱ्यावेळी ते जाणार असलेल्या रस्त्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने रंगीत तालीम करण्यात येते. तशीच रंगीत तालीम शहा यांच्या दौऱ्यानिमित्त शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी वाहतूक थांबवण्यात आल्याने अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले होते. यामध्ये टिप टॉप हॉटेल, जे. डब्लू मॅरियट, पंडित फार्म, ओंकारेश्वर मंदिर, खासदार गिरीश बापट यांचे निवासस्थान आणि आंबेगाव येथील शिवसृष्टीचा समावेश आहे. पुणे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह वाहतूक शाखेचे उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेचे ३०० कर्मचारी आणि २२ अधिकारी सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी आंबेगाव येथे साकारली आहे. शाह यांच्या हस्ते या शिवसृष्टीचे रविवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने लोकार्पण होत आहे. त्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शिवसृष्टीच्या परिसरातील अंतर्गत रस्ते गेल्या कित्येक दिवसांपासून खराब होते. रस्ते दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त पूर्ण झाली. त्याचबरोबर अतिक्रमण विभागही कमालीचा तत्पर झाला आहे. दुकानदारांवर दंडेली करून काहींच्या दुकानाबाहेरील खुर्च्याही कर्मचाऱ्यांनी उचलून नेल्याचे दुकानदारांनी सांगितले. काहींनी किराणा दुकानातील माल उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तर काही दिवसांपासूनच येथे तळ ठोकला आहे. सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी ताफ्यासह येथे फिरून लोकांना दौऱ्यापूर्वी दुकाने बंद करावी लागतील, अशी सूचना देत होते. काहींना तर शुक्रवार ते रविवार दुकाने बंद करण्यास सांगितले. त्यानंतर या निर्णयात सुधारणा करीत रविवारी सकाळपासून कार्यक्रम संपेपर्यंत शिवसृष्टीच्या लेनमधील दुकाने बंद ठेवावीत, असे लेखी आणि तोंडी आदेश देण्यात आले आहेत. या लेनमध्ये रसवंतीगृह, गॅरेज, किराणा माल दुकान, लहान-मोठी हॉटेल, नाश्ता व उपाहार केंद्र, स्नॅकसेंटर, पानटपरी, चिकन-अंडी विक्रेते आहेत. त्याचबरोबर सिंहगड कॉलेजमुळे कॅफेटेरियाची संख्याही लक्षणीय आहे. ही दुकाने कार्यक्रम काळात बंद राहतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त आंबेगाव बुद्रुक परिसरातील नागरिकांना दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आंबेगाव बुद्रुक परिसरातील नागरिकांवर हा अन्याय आहे. शुक्रवारपासूनच काही मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कलाही अडथळे येत आहेत. इंटरनेट वेगाने चालत नाही, तर कॉलमध्येही अडथळे येत आहेत. त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणजे गेले कित्येक महिने पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने येथील रस्त्यांवर डांबरीकरण केले नव्हते. या दौऱ्यामुळे डांबरीकरण झाल्याची खोचक प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेच्या आशिष भोसले यांनी दिली.
रसवंतीगृह चालक दीपक साळुंके म्हणाले, शुक्रवार ते रविवार दुकाने बंद करावी लागतील, असे पोलिसांनी सांगितले होते. नंतर, त्यांनीच येऊन आम्ही सांगेल तेव्हा दुकान बंद करा, असा सुधारित आदेश दिला. आता, रविवारी (दि. १९) दुपारी कार्यक्रम संपेपर्यंत दुकान बंद ठेवण्यास सांगितले आहे. या दौऱ्यामुळे अतिक्रमण विभागाचा त्रासही वाढला. अतिक्रमण विभागाच्या गाडीतून आलेल्या
कर्मचाऱ्यांनी दुकानासमोरील वाहतुकीला अडथळा न होणाऱ्या सहा खुर्च्या उचलून नेल्या. आता त्या सोडवायला कोण जाणार ? हे नुकसान सहन करावे लागणार. येथील नागरिकांना दोन दिवसांपासून मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळे येत आहेत. कॉल केल्यास आपला आवाज समोरच्याला समजत नाही. तर, इंटरनेटचा स्पीड कमी झाला आहे. जॅमर तर लावले नाही ना, असा संशय येत आहे.
किराणा दुकानदार योगेश डांगी म्हणाले, मंत्री येणार म्हणून अर्धा दिवस दुकान बंद ठेवायला सांगितले आहे. आमच्यासाठी रविवारचा दिवस महत्त्वाचा असतो. अनेक ग्राहक आम्हाला फोनवरून मालाची यादी पाठवतात. त्यानुसार आम्ही माल बांधून तयार ठेवतो. कधी ग्राहक माल न्यायला येतात, तर कधी आम्ही माल पोहोचवतो. या दौऱ्यामुळे कामात अडथळा येणार आहे. या दौऱ्यामुळे येथील रस्ता दुरुस्त झाला. मात्र, अतिक्रमण विभागाचा त्रास झाला. माझ्या दुकानासमोर माल
उतरवला होता. एक पोते आतमध्ये न्यायचे राहिले होते. ते पोते उचलून घेऊन जात होते. मी, तीव्र विरोध केल्याने त्यांनी पोते खाली टाकले. एक पानवाला नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाला, मंत्री आल्यामुळे येथे रस्ता झाला, मात्र दुकान बंद करण्याची जबरदस्ती केली जात आहे, हे योग्य नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.