‘बिग बॉस’ विजेता स्टॅनकडे २० ब्रँडची ऑफर
‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा विजेता ठरलेला एमसी स्टॅन सध्या चर्चेत आहे. पुण्याचा रॅपर असलेल्या एमसी स्टॅनने सर्वाधिक मत मिळवून ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्याची लोकप्रियता व फॅन फॉलोइंग पाहून अनेक ब्रँडच्या ऑफरही त्याला मिळाल्या आहेत.
‘बिग बॉस’चं विजेतेपद मिळवल्यानंतर एमसी स्टॅनचं नशीब उजळलं आहे. स्टॅनला ‘अॅमेझॉन मिनी टीव्ही’ची ऑफर मिळाली आहे. अॅमेझॉनने स्टॅनशी करारही केला आहे. याशिवाय इतर २० ब्रँडच्या ऑफरही स्टॅनला मिळाल्या असल्याची माहिती आहे. एमसी स्टॅनचे मॅनेजर अपूर्व भटनागर यांनी ही माहिती दिली. एमसी स्टॅन ‘बिग बॉस’च्या घरातल्या चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता. स्टॅनने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही त्याच्या खेळाची दखल घ्यायला भाग पाडले. रॅपर म्हणून प्रसिद्ध असलेला स्टॅन त्याच्या हटके स्टाइलमुळेही चर्चेत होता. 'टॉप २'मध्ये स्थान मिळवलेल्या स्टॅन व शिव ठाकरेमध्ये ट्रॉफीसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली होती.
‘बिग बॉस १६’चा विजेता ठरल्यानंतर एमसी स्टॅनवर बक्षिसांचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’च्या चमकणाऱ्या ट्रॉफीबरोबरच त्याला ३१ लाख ८० हजार रुपये मिळाले. याशिवाय त्याला हुंडाई ग्रॅन्ड आय टेन निऑस ही गाडीही भेट म्हणून देण्यात आली. ‘बिग बॉस’मधून कमावलेल्या पैशांतून आईसाठी घर घेणार असल्याचं स्टॅनने सांगितलं.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.