भाजप-महायुतीच्या प्रचारात आता धनुष्यबाण
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर भाजपा शिवसेना महायुतीची कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही राज्यातील पहिली निवडणूक असणार आहे. निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत देण्यात आलेल्या निर्णयाचा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेला मानणारा मोठा मतदार महाविकास आघाडीकडून भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना आणि धनुष्यबाण हे नाव घेऊन पहिल्यादाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दोन्ही पोटनिवडणुकीतील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे, स्थानिक खासदार श्रीरंग बारणे आता धनुष्यबाणासह प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि काँग्रेससह अन्य पक्ष असून, त्यांचे चिंचवडचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे तसेच कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना शिवसेनेच्या ठाकरे गट म्हणून मिळणाऱ्या मतांची विभागणी रोखण्याचे आव्हान आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह ठाकरे गटाला पेलावे लागणार आहे.
चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना नुकत्याच झालेल्या मेळाव्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या शिवसेनेला उभारी देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. या कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रोटोकॉल वगळून आदित्य ठाकरे यांना शेवटी बोलण्याची संधी दिली होती.
शिवसेनेची मते एकगठ्ठा मिळाली पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी एकोप्याने काम करा, असा संदेशही दिला होता.
मात्र, दुसरीकडे ठाकरे गटातील माजी नगरसेवक राहुल कलाटे हे महाविकास आघाडीतून बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची काही मते कलाटे यांच्या पदरात पडणार असून, आता शिवसेना नाव आणि
धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने शिवसेनेची मते भाजप उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मिळण्याची शक्यता असल्याने याचा थेट फटका हा नाना काटे यांना बसणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.