धंगेकर महात्मा गांधींना प्रचारात आणतील
#कोल्हापूर
कसबा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. १७) वादग्रस्त वक्तव्य केले. ‘‘मविआचे धंगेकर शेवटच्या दोन दिवसांत प्रचारासाठी महात्मा गांधींना स्वर्गातून घेऊन येतील,’’ असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने सडकून टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अखेरच्या दोन दिवसांत महात्मा गांधींना स्वर्गातून प्रचाराला घेऊन येईल. तेव्हा म्हटले पाहिजे की, आता तुम्ही महात्मा गांधींना प्रचाराला बोलावले तर ते वर्षभर नाही पुरणार.’’
‘‘शेवटच्या दोन दिवसांत महात्मा गांधींना प्रचारासाठी बोलावण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. महात्मा गांधींना प्रचारासाठी बोलावण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू शकलो तर आम्ही जिंकू. महात्मा गांधी कळले का? महात्मा गांधी नाही कळले? असे आहे की, झोपडपट्टीतील माणसांना जे कळते ते तुम्हाला कळत नसेल तर पत्रकारांचा प्रशिक्षण वर्ग घ्यावा लागेल. प्रत्येक निवडणुकीत हतबल होऊन विरोधकांना स्वर्गात गेलेल्या महात्मा गांधींना प्रचारासाठी बोलवावे लागते. त्यांना प्रचारासाठी बोलावल्यानंतरच निवडणुका जिंकता येतात,’’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
कसब्यातील पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून प्रचारसभेत चांगलीच रंगत येत आहे. एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडत असतानाच आधी कोल्हापूरच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील जे बोलले होते त्याचाच कित्ता आता त्यांनी या निवडणुकीतही गिरवला.
‘‘आजही यांना महात्मा गांधींची भीती वाटते. गांधींच्या विचारावर चालणारी काँग्रेस यांच्या हुकूमशाहीला आणि मनुस्मृतीला अडसर ठरत आहे, याचा अर्थ असा होतो. मात्र, काँग्रेस कधीही आजारी व्यक्तीला प्रचारासाठी बाहेर काढणार नाही, वाटल्यास निवडणूक सोडून देईल. यांनी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्यासोबत तेच केले,’’ असे सांगत काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजपच्या कृत्यांचा पाढा वाचला.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.