मुख्यमंत्र्यांच्या मुलाने दिली माझी सुपारी
#मुंबई
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्यासाठी ठाण्यातील एका गुंडाला सुपारी दिली आहे,’’ असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (दि. २१) केला.
राज्यातील सत्तासंघर्ष आता वेगळ्याच गंभीर वळणावर पोहोचला असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करणारे पत्र राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई तसेच ठाणे पोलीस आयुक्तांनादेखील पाठवले आहे.
आपल्या पत्रात राऊत म्हणतात, ‘‘गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे आणि हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे आणि गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी ‘राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही,’ असा सवाल उपस्थित केला. ‘‘विरोधी पक्षातील आमदारांना धमक्या देण्यात येत आहेत. दुसरीकडे गद्दार आमदारांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला तरी त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही,’’ हा विरोधाभास आदित्य ठाकरे यांनी लक्षात आणून दिला.
श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी राऊत यांनी हे पत्र दिल्याचा संशय गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे, ते याचा तपास करतील. केवळ श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी हे पत्र संजय राऊत यांनी दिले असावे. त्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी हे खोटे पत्र दिले आहे. पोलीस याची संपूर्ण माहिती घेतील.’’ वृत्तसंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.