पीएमपीची ५ रुपयांत ५ किमी योजना बंद
विजय चव्हाण
शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीच्या डेपोपासून ५ किलोमीटरच्या अंतरासाठी ५ रुपये तिकीट ही योजना बंद झाली असून, आता त्याऐवजी नेहमीप्रमाणे तिकीट आकारणी होणार आहे. त्यामुळे टप्प्यानुसार प्रवाशांकडून पाच ते दहा रुपये तिकीट आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा बदल २८ मार्गांवर होणार आहे.
पीएमपीने २५ ऑक्टोबर २०२० पासून पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये तिकीट आकारणी सुरू केली होती. त्यासाठी ५६ मार्ग निश्चित करण्यात आले होते. परंतु, काही मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे ते बंद करून २८ मार्गांवर ही सेवा सुरू ठेवण्यात आली होती. परंतु, बस वाहतुकीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा विचार करता ५ किलोमीटर अंतरासाठी ५ रुपये तिकीट आकारणीमुळे पीएमपीचे आर्थिक नुकसान होत होते. त्यातून संचलनातील तूटही वाढत होती. त्यामुळे या २८ मार्गांवर १९ फेब्रुवारीपासून नेहमीच्या दराने तिकीट आकारणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.