ऑक्सिजन प्रकल्पच ऑक्सिजनवर
राजानंद मोरे
नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तसेच रिफिलिंग स्टेशनची दुरवस्था झालेली आहे. प्रकल्पातच कर्मचाऱ्यांचा स्वयंपाक सुरू आहे. ऑक्सिजन टाकीवर कपडे वाळण्यासाठी टाकले जात आहेत.
नायडू रुग्णालयामध्ये महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचे काम वेगात सुरू आहे. रुग्णालयाची इमारतही महाविद्यालयाला देण्यात आली आहे. तर परिसरात रुग्णालय, निवासी व्यवस्था आदींसाठी इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी मोठे खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. रुग्ण तसेच इतर सर्व विभागांना पूर्वीच्या वॉर्ड क्रमांक सहा आणि सातमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांना सिलिंडरमधून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. तर कोट्यवधी रुपये खर्च करून कोविडकाळात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाकडे आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकल्पातील काही साहित्य चोरीला गेले आहे.
ऑक्सिजन प्रकल्प बांधकामात अडथळा ठरत असल्याने ते हलविण्याची सूचना महापालिकेच्या भवन रचना विभागाने आरोग्य विभागाला केली आहे. त्यानुसार हा प्रकल्प तिथून हलविण्यात येऊन सध्या वॉर्ड क्रमांक सहाजवळ उभारण्यात येणार असल्याचा दावा सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दीड महिन्यांपूर्वी केला होता. पण अजूनही हा प्रकल्प आहे त्याच जागेवर उभा आहे. आता जुने वॉर्डही हलविण्याची सूचना भवन विभागाने दिल्याने प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोविडच्या लाटेत रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासल्याने मार्च-एप्रिल २०२१ मध्ये रुग्णालयात दोन ऑक्सिजन निर्मिर्ती टॅंक, एक रिफिलिंग स्टेशन आणि एक लिक्विड ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आला.
कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पावर सध्या धूळ चढू लागली आहे. प्रकल्पातील काही महागड्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. प्रत्येकी अडीच लाख रुपयांच्या घरात किंमत असलेल्या १३ ड्यूरा सिलिंडरची दुरवस्था झाली आहे. प्रकल्पामध्ये कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केलेली दिसते. तिथेच ते स्वयंपाक करतात. त्यांचे सर्व घरगुती साहित्य प्रकल्पातच आढळून आले. ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पाईपचा वापर कपडे सुकविण्यासाठी केला जात आहे. परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून प्रकल्पावर धुळीचे थर साठले आहेत. सुरक्षेबाबत कोणतीही दक्षता घेतली जात नसल्याचे पाहणीमध्ये आढळून आले.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून हा प्रकल्प महाविद्यालयाच्या आवारात बसविण्यात येणार असल्याचे समजते. परिसरात महाविद्यालय आणि नवे रुग्णालयही उभे राहणार आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारावा लागणारच आहे. त्यामुळे याच प्रकल्पाचा वापर केला जाऊ शकतो. किंवा हा प्रकल्प अन्य रुग्णालयांमध्ये हलवावा लागेल. नायडू रुग्णालय हे बाणेर येथील इमारतीत हलविणे जाणार आहे. तेथे आधीपासूनच ऑक्सिजन प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प तिकडे स्थलांतरित करता येणार नाही. हे पाहता प्रकल्प या ठिकाणीच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. इमारतींची कामे पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पाटसुते यांना विचारले असता ते म्हणाले, ‘रुग्णालय स्थलांतरित करायचे म्हटल्यावर त्यासोबत असलेल्या सर्व गोष्टी स्थलांतरित कराव्या लागतात.’
नायडूतील दोन टॅंकची क्षमता दोन हजार लीटर प्रतिमिनिट एवढी आहे. दोन्हीसाठी जवळपास सव्वा तीन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी एक टॅंक बसविण्यातच आला नाही. राज्य शासनाकडून दुसऱ्या लाटेदरम्यानच १३ टन क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टॅंक देण्यात आला, पण हा टॅंक बसविण्यातच आला नाही. तो अजूनही धूळखात पडून आहे. लिक्विड टॅंकसाठी ४५ लाख आणि रिफिलिंग स्टेशनसाठी १९ लाख रुपये खर्च केल्याचे समजते. कोविडच्या दुसऱ्या लाटेत केवळ काही दिवसच ऑक्सिजननिर्मिती टॅंकचा वापर करण्यात आला. रुग्ण कमी झाल्यापासून हा प्रकल्प बंदच आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.