निवडणूक चिंचवडची, गर्दी बाहेरची!
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी होणाऱ्या सभेला पिंपरी, भोसरी विधानसभा मतदासंघातील मतदारांना आणून बसविले जात असल्याचे दिसून येत आहे.
व्यासपीठावर पक्षाचे मान्यवर नेते उपस्थित असताना उमेदवारांना मतदार गोळा करता येत नसल्याने ही निवडणूक कोणत्या दिशेने जात आहे असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या पोट निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून विठ्ठल ऊर्फ नाना काटे आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे हे बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
स्थानिक मतदार अत्यल्प
वाल्हेकरवाडी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्याला पिंपरी खराळवाडी, गांधीनगर भागातील मतदार दिसून आले होते. त्यानंतर पिंपळे निलख येथे झालेल्या प्रचार सभेला बाहेरचेच मतदार गोळा केल्याचे दिसून आले. पिंपळे निलख, सौदागर परिसर हा सुशिक्षित मतदारांचा परिसर म्हणून ओळखला जातो. शनिवारी झालेल्या सभेला मतदारांची संख्या अत्यंत नगण्य असल्याचे पाहायला मिळाले.
राज्यासह देशातील दिग्गज नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले असतानाच या नेत्याच्या सभेला गर्दी करण्यासाठी बाहेरून लोकांना बोलवावे लागत असल्याने खरा मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. सभेला महिला मतदारांची गर्दी अधिक असल्याचे दाखविण्यासाठी अन्य परिसरातून माता-भगिनींना आणण्यात आले होते. त्या लहानग्या मुलाबाळांसह सभेला आल्याने चिमुरड्यांची चलबिचल सुरू होती.
दुचाकीत पेट्रोल
पिंपरी आणि भोसरी परिसरातून तरुणांची गर्दी देखील गोळा केली होती. सुमारे अडीचशेहून अधिक मुलांना दुचाकीत पेट्रोल टाकून गोळा केले गेले होते. आमच्या मित्रांच्या मदतीला आलो असल्याचे हे तरुण सांगत होते. दुचाकी रॅलीसाठी या तरुणांना पिंपरीतील नगरसेवक घेऊन आले होते. सोसायटीमधील अनेक प्रश्न कायम आहेत. कचरा, पाणी प्रश्न असल्याचे नेते व्यासपीठावरून सांगत होते. पण सभेला उपस्थित नागरिक हे पोटाची खळगी भरण्यासाठी हातभार लागेल म्हणून आलेले आहेत हे नेत्यांच्या गावी नव्हते असे त्यांच्या भाषणावरून दिसून आले.
पिंपळे निलख हा परिसर एअर बफर झोन असून, या भागात उच्च प्रकाशमानतेचे दिवे आकाशात सोडण्यास मनाई आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रचार सभेसाठी सर्रासपणे या दिव्यांचा वापर केला होता. पोलीस बंदोबस्त असताना त्यांच्या समोर हा प्रकार सुरू होता. भारतीय सैन्य दलाच्या औंध कॅम्प परिसराला लागून पिंपळे निलख हा परिसर असताना आकाशात सोडलेल्या या दिव्यांबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.