केळकर समाधीला अखेर ‘मुक्ती’
मयूर भावे
TWEET@mayur_mirror
नदीपात्रात ओंकारेश्वराच्या मागील बाजूस असलेल्या कै. गंगाधर केळकर यांच्या समाधीची अखेर अतिक्रमणातून सुटका झाली आहे. ओंकारेश्वराच्या मागील बाजूस शंकराची एक मोठी पिंड आहे. ते महादेवाचे मंदिर नसून कै. गंगाधर केळकर यांची समाधी आहे. मात्र, तेथे विविध स्वरूपाचे बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू होता. कै. गंगाधर केळकर यांचे नातू व नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर व त्यांच्या कुटुंबीयांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी त्याला विरोध केला. या घटनेचे वृत्त 'सीविक मिरर'ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन संबंधित व्यक्तींनी समाधीभोवतीचे अतिक्रमण हटवले आहे.
समाधी उभारणीचे सुबक उदाहरण असलेल्या कै. गंगाधर केळकर समाधीशिल्पाने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. समाधीची माहिती मिळाल्यावर तेथे मंदिर समजून काही लोकांनी केलेले लोखंडी बांधकाम त्यांनी स्वतःहून काढून टाकले आहे. डॉ. श्रीकांत केळकर यांनीच ही माहिती दिली. ते ज्येष्ठ संग्राहक कै. दिनकर केळकर यांचे पुतणे आहेत.
कै. गंगाधर केळकर यांची समाधी हा समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना आहे. १९२८ मध्ये ह्या समाधीचे बांधकाम झाले होते. मात्र, आता तिचे मूळ स्वरूप बदलण्याचे प्रयत्न काही लोकांकडून सुरू झाले होते. मात्र, त्या सर्वांची भेट घेऊन आणि समाधीस्थळी महादेवाचे मंदिर समजून येणाऱ्या नागरिकांनाही केळकर कुटुंबीयांनी समाधीची माहिती दिली, तसेच तिचे दैवतीकरण न करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देऊन संबंधित व्यक्तींनी बांधकाम हटवले आहे. समाधीस्थळी आता ती कोणाची समाधी असून, केव्हा बांधली गेली याची माहिती देणारा फलकही केळकर कुटुंबीयांनी लावला आहे.
ही समाधी केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर आणि त्यांचे बंधू भास्कर केळकर यांच्या कलाप्रेमाचा नमुनाही आहे. गंगाधर या शब्दाचा अर्थ शंकर असा असल्याने उभारणीच्या वेळीच समाधीवर कलात्मकरीत्या पिंड बसवण्यात आली होती,' असे डॉ. श्रीकांत केळकर यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.