पाकिस्तान पीपल्स पार्टीचे झरदारी आता अध्यक्ष होणार
#इस्लामाबाद
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख नेते असिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे नवे अध्यक्ष होण्याची दाट शक्यता असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. सत्तास्थापनेसाठी ‘पीपीपी’ने पाकिस्तान मुस्लीम लीगबरोबर (नवाज गट) आघाडी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या पक्षाच्या वाट्याला हे महत्त्वाचे पद येणार आहे.
असिफ झरदारी हे दिवंगत माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती आणि ‘पीपीपी’चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांचे वडील आहेत. त्यांनी यापूर्वीही देशाचे अध्यक्षपद सांभाळले आहे. यंदाही निवड झाल्यास या पदावरून काम करण्याची त्यांची ही दुसरी वेळ असेल.
पंतप्रधानपदासाठी नवाज शरीफ यांचे बंधू आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे नाव घोषित करण्यात आले असून आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांनाही देशाचे नेतृत्व करण्याची दुसऱ्यांदा संधी मिळणार आहे. याच आठवड्यात सरकार स्थापन होण्याची शक्यता असून निवडणुकीचा निकाल लागल्यापासून पाकिस्तानमध्ये कोणतेही सरकार अजून अस्तित्वात आलेले नाही.
इम्रान खान यांचे समर्थक उमेदवार सर्वाधिक संख्येने निवडून आले असले तरी हेच उमेदवार आता इतर पक्षांकडे जात असल्याने पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षात चिंता व्यक्त होत आहे. आतापर्यंत किमान सात विजयी उमेदवार नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीगमध्ये दाखल झाले आहेत.
पक्षाची साथ सोडण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जात असल्याचा दावा शाहनवाज जादून या उमेदवाराने केला आहे. जादून यांनी एक व्हीडीओ प्रसिद्ध करत, ‘मतमोजणीत मी आघाडीवर असताना माझ्यावर इम्रान यांची साथ सोडण्यासाठी दबाव आणला जात होता. मी नकार दिल्यावर मला पराभूत म्हणून घोषित करण्यात आले,’ असा आरोप केला.वृत्तसंंस्था