संग्रहित छायाचित्र
न्यूयॉर्क : अमेरिकेतील गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून उर्जा उद्योगांच्या उभारणी संदर्भात भारतातील सरकारी अधिकाऱ्याना तब्बल २,२०० कोटी रुपयांची लाच दिली गेली. अमेरिक कायद्यानुसार हा गुन्हा आहे. आणि या संदर्भामध्येच अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) भारतामधील प्रसिद्ध उद्याोगपती गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांना समन्स बजावले आहे.
या दोघांवर भारतामधील काही राज्यांमध्ये सौर ऊर्जा कंत्राटे मिळवण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलर (२,२०० कोटी रुपये) लाचेपोटी दिल्याचा आरोप अमेरिकन न्यायालयामध्ये करण्यात आला आहे. गौतम अदानी यांच्या अहमदाबादमधील शांतीवन फार्म निवासस्थानी आणि सागर अदानी यांच्या अहमदाबादमधीलच बोडकदेव निवासस्थानी ही समन्स पाठवण्यात आली आहेत.
एसईसीकडून दिनांक २१ नोव्हेंबर रोजी ही नोटीस बजावण्यात आली. काका आणि पुतण्या या दोघांनीही २१ दिवसांच्या आत याला उत्तर देण्यास सांगितले आहे. अदानी यांच्यावर सौर ऊर्जा कंत्राटासाठी अमेरिकी गुंतवणूकदारांचे पैसे लाच देण्यासाठी वापरल्याचा आणि अमेरिकी गुंतवणूकदारांच्या पैशांच्या व्यवहाराची माहिती तेथील यंत्रणेपासून लपवून ठेवल्याचा आरोप आहे.
‘न्यूयॉर्क ईस्टर्न डिस्ट्रिक्ट कोर्टा’ने अमेरिकेच्या दिवाणी कार्यवाहीच्या फेडरल नियमांच्या नियम १२ अंतर्गत हे समन्स बजावले आहे. ‘‘तुम्हाला हे समन्स बजावल्यापासून २१ दिवसांच्या आत तुम्ही फिर्यादीला उत्तर पाठवले पाहिजे,’’ असे त्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच याला उत्तर दिले नाही तर कसूर केल्याचा निकाला दिला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. सागर अदानी हे ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’चे संचालक आहेत. वृत्तसंंस्था
अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने अन्य सहा जणांवर लाचखोरीचा आरोप केला आहे. अदानी समुहाची कंपनी अज्योर पॉवर ग्लोबलचे कार्यकारी अधिकारी सिरील कॅबेन्स यांच्यावर आरोप ठेवले आहे. अदानी समूहाने अमेरिकी फर्मसह अन्य गुंतवणूकदारांकडून कर्ज आणि रोख्यांच्या स्वरूपात दोन अब्ज डॉलर उभे केले. त्यासाठी त्यांनी या फर्मच्या लाचखोरीविरोधी धोरणांशी संबंधित खोटे व दिशाभूल करणारे विवरणपत्रे वापरली असाही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र अदानी समूहाने हे आरोप फेटाळले आहेत.
ओडिशातील बीजेडी सरकारने फेटाळले आरोप
बिजू जनता दल (बीजेडी) सत्तेवर असताना ओडिशामधील सरकारी अधिकाऱ्यांनी अदानी उद्योग समूहाकडून लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सौरऊर्जा प्रकल्पातील महागडी वीज खरेदी करण्यासाठी काही राज्यांतील सरकारी अधिकाऱ्यांना उद्योजक गौतम अदानी यांनी लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. बिजू जनता दल (बीजेडी) सत्तेवर असताना ओडिशामधील सरकारी अधिकाऱ्यांनी अदानी उद्योग समूहाकडून लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र ओडिशातील अधिकाऱ्यांवर झालेले आरोप खोटे असून वस्तुस्थितीवर आधारित नाहीत, असे ओडिशाचे माजी ऊर्जामंत्री आणि बिजू जनता दलाचे आमदार पी. के. देब यांनी सांगितले.
उद्योजक गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेने लाचखोरीचा आरोप केल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. संसदेच्या आगामी अधिवेशनात काँग्रेस हा मुद्दा उपस्थित करेल आणि आरोपांची चौकशी करण्याची मागणी करेल सरकारला सर्व काही माहीत आहे. मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. - मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस अध्यक्ष
अमेरिकेतील आरोपपत्रांच्या अहवालांचा अभ्यास करण्यात येईल. या आरोपपत्रांचा अभ्यास करून त्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल. - एन. चंद्राबाबू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
“अमेरिका आणि भारत या दोन देशांमधील संबंध मजबूत आधारावर उभे आहेत. अर्थांतच आम्हाला या आरोपांबद्दल माहिती आहे आणि अदाणी समूहाविरूद्ध करण्यात आलेल्या आरोपांबद्दल सविस्तर तपशीलांसाठी तुम्हाला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (डिओजे) यांच्याकडे जावे लागेल”. - कॅरिन जीन-पिअर, व्हाइट हाऊस सेक्रेटरी
“अमेरिकेच्या विधी विभागाकडून ‘अदाणी ग्रीन्स’च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत”. - गौतम अदानी, अदानी समुहाचे संस्थापक