संग्रहित छायाचित्र
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतामधील कुर्रम खोऱ्यामध्ये गुरुवारी (दि.२१) झालेल्या हल्ल्यामध्ये ५० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये आजपर्यंत झालेल्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्यापैकी या घटनेकडे पाहिले जाते. पेशावरहून कुर्रमकडे जाणाऱ्या एका प्रवासी बसवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी (दि.१९) खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात लष्कराच्या चौकीवर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात १२ पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते तर सहा दहशतवादीदेखील मारले गेले. माहिती देताना पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगने सांगितले की, दहशतवाद्यांनी चेक पोस्टच्या भिंतीवर वाहन घुसवले आणि त्यात ठेवलेल्या स्फोटकांद्वारे स्फोट घडवून आणला. या स्फोटात १२ जवान शहीद झाले होते. प्रत्युत्तरादाखल लष्करानेही ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
या दरम्यान बलुच बंडखोरांनी लष्कराच्या चौकीवर गोळीबार केला. या हल्ल्यात ७ जवान शहीद झाले असून १५ जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी ९ नोव्हेंबरला स्फोट झाला. या स्फोटात २६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) या दहशतवादी संघटनेनेही या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
बीएलएच्या प्रवक्त्याने सांगितले की, मजीद ब्रिगेड युनिटने हा आत्मघाती हल्ला केला आहे. त्यांचे टार्गेट इन्फंट्री स्कूलचे सैनिक होते, जे कोर्स पूर्ण करून जाफर एक्सप्रेसने पेशावरला जाणार होते. क्वेट्टा सिव्हिल हॉस्पिटलचे प्रवक्ते वसीम बेग यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनला सांगितले की, मृतांमध्ये १४ लष्करी जवान आणि १२ नागरिकांचा समावेश आहे.
बलुचिस्तानमध्ये तीन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता
१६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या पश्चिमेकडील बलुचिस्तान प्रांतात लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानी सुरक्षा दलाचे ७ जवान शहीद झाले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वृत्तसंस्था एएफपीने एका स्थानिक व्यक्तीच्या हवाल्याने सांगितले की, या हल्ल्यात ४० ते ५० बलोच बंडखोरांचा सहभाग होता.