संग्रहित छायाचित्र
मॉस्को : रशिया युक्रेन युद्ध अमेरिकेतील राजकिय घडामोडींमुळे रोज अत्यंत घातक पातळीवर पोहचत आहे. कारण रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि. २०) युक्रेनने ब्रिटीशी बनवाटीचे शॅडो हे क्रुझ क्षेपणास्त्रांचा मारा रशियावर केला. रशियाच्या कुर्स्क भागात तब्बल १२ क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचे सांगितले. ब्लादिमिर पुतिन यांनी घटनादुरुस्ती करून नियमात केलेल्या बदलानुसार ज्या देशाकडे अण्वस्त्रे नाहीत अशा देशाने अणुशक्ती असलेल्या देशाच्या पाठिंब्याने रशियावर हल्ला केला तर तो रशियाविरुद्ध युद्धाची घोषणा मानला जाईल. अशा स्थितीत मॉस्को अण्वस्त्रांचा वापर करू शकतो. त्यामुळे ही तिसऱ्या महायुद्धाची सुरवात आहे की काय अशी जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंगळवारी म्हणजेच (दि. १९) रोजी रशियाच्या अंतर्गत भागात अमेरिकन लांब पल्ल्याची एटीओसीएमएस ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीचा उपयोग करीत हल्ला कला होता. यावर रशियाने तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले होते की जर नाटो देशांची शस्त्रे रशियाच्या भूमिवर वापरली गेली तर ती तिसऱ्या महायुद्धाची सुरवात मानण्यात येईल.
रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यानंतर 3 नॉर्डिक देशांनी युद्धाचा इशारा दिला आहे. नॉर्वे, फिनलंड आणि डेन्मार्कने त्यांच्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा साठा ठेवण्याची आणि त्यांच्या सैनिकांना युद्धासाठी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक, या देशांच्या सीमा रशिया आणि युक्रेनला लागून आहेत. युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला झाल्यास या देशांना त्याचा फटका बसू शकतो. नॉर्वेने पॅम्प्लेट वाटून आपल्या नागरिकांना युद्धाचा इशारा दिला आहे.
स्वीडननेही आपल्या 52 लाखांहून अधिक नागरिकांना पॅम्प्लेट पाठवले आहेत. अणुयुद्धाच्या वेळी किरणोत्सर्गापासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आयोडीनच्या गोळ्या ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. अमेरिकेत ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर बायडेन सरकार युक्रेनला मदत करण्यासंदर्भात नवीन निर्णय घेत आहे.
बायडेन यांनी सोमवारी युक्रेनला एटीएसीएमएस क्षेपणास्त्रांसह रशियावर हल्ला करण्यास अधिकृत केले. यानंतर मंगळवारी युक्रेनने रशियावर क्षेपणास्त्रे डागली. बायडेन प्रशासन युक्रेन युद्ध लांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
क्रूझ क्षेपणास्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रातील फरक
क्रूझ क्षेपणास्त्र एक प्रकारचे स्वयं-मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे. ते जमिनीच्या अगदी जवळून उडतात. हे क्षेपणास्त्र स्वतःचा मार्ग बनवते, म्हणून याला क्रूझ क्षेपणास्त्र म्हणतात. तर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्यानंतर हे क्षेपणास्त्र वेगाने वर जाते आणि नंतर गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने खाली येते आणि लक्ष्यावर आदळते.
क्रूझ क्षेपणास्त्र जेट इंजिन तंत्रज्ञानाच्या मदतीने ते पृथ्वीच्या वातावरणात उड्डाण करतात. त्यांचा वेग अतिशय वेगवान आहे. कमी उंचीवर उड्डाण केल्यामुळे ते रडारने पकडले जात नाही. हे जमीन, हवाई, पाणबुडी आणि युद्धनौका कुठूनही डागले जाऊ शकतात. क्रूझ क्षेपणास्त्रांना त्यांच्या क्षमतेनुसार सबसॉनिक, सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांमध्ये विभागले जाऊ शकते. उदाहरणार्थ, भारताचे ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे आणि ब्रह्मोस 2 हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे.क्रूझ क्षेपणास्त्रे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा आकाराने लहान असतात आणि हलक्या बॉम्ब वाहून नेतात. क्रूझ क्षेपणास्त्रे पारंपारिक आणि अणुबॉम्ब दोन्हीसाठी वापरली जातात.