संग्रहित छायाचित्र
तेल अविव : हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेने इस्राएलला चोख प्रत्युत्तर दिले आहे. इस्राएलने बैरुतवर मोठे हवाई हल्ले केले होते. याचा बदला म्हणून रविवारी (दि. २४) रात्री सुमारे २५० रॉकेट व इतर शस्त्रांनी इस्राएलवर हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इस्राएलचे ७ नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. इस्राएलच्या मध्यभागी असलेल्या तेल अविवपर्यंत हे रॉकेट पोहोचले होते. हिजबुल्लाहचा हा गेल्या काही महिन्यांतील इस्राएलवरील सर्वांत घातक हल्ला मानला जात आहे.
हिजबुल्लाहने इस्राएलवर केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या सात जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती इस्राएलच्या बचावपथकाने दिली आहे. एकीकडे इस्राएल आणि हिजबुल्लाहमध्ये युद्धविरामासाठी वाटाघाटी सुरू आहेत, तर त्याच वेळी हिजबुल्लाहने बैरुतमध्ये इस्राएलने केलेल्या भीषण हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान, रविवारी इस्राएलच्या हल्ल्यात लेबनॉनचा एक सैनिक ठार झाला आहे, तर १८ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या लष्कराने दिली आहे. इस्राएली लष्कराने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. हिजबुल्लाहविरुद्धच्या युद्धक्षेत्रात हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्टीकरण इस्राएलने दिले आहे. लष्कराची कारवाई केवळ अतिरेक्यांविरोधात करण्यात आली आहे. इस्राएल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून इस्राएलच्या हल्ल्यात लेबनानचे ४० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत. मात्र, लेबनॉनचे सैन्य या युद्धापासून दूर आहे.
लेबनॉनचे काळजीवाहू पंतप्रधान नजीब मिकाती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युद्धबंदीच्या प्रयत्नांवरील हा हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इस्राएली लष्कराने सांगितले की, रविवारी सुमारे २५० रॉकेट डागण्यात आले. त्यापैकी काही हवेतच नष्ट करण्यात आले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्राएलने शनिवारी बैरुतवर केलेल्या हवाई हल्ल्यात २९ जण ठार तर ६७ जण जखमी झाले आहेत.