इस्राएलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याविरोधात अटक वॉरंट; आंतराष्ट्रीय न्यायालयाने युद्ध गुन्हेगार म्हणून केले घोषित
गाझामध्ये पॅलेस्टिनींवर होत असलेल्या अत्याचारांसाठी आणि हजारो लोकांच्या उपासमारीसाठी कारणीभूत झाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (आयसीसी) गुरुवारी (दि. २१) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले.
दरम्यान आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या अटक वॉरंटवरून पाश्चात्य देश आपसांत विभागले गेले आहेत. न्यूज एजन्सी एपीनुसार, अमेरिकेने अटक वॉरंट स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर ब्रिटन, कॅनडा, नेदरलँड आणि इटलीने नेतन्याहू त्यांच्या देशात आल्यास त्यांना अटक केली जाईल, असे म्हटले आहे.
नेतन्याहू यांच्यावर गाझामधील युद्ध गुन्ह्यांचा आरोप आहे. या प्रकरणी इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री योव गॅलांट आणि हमासचा माजी कमांडर मोहम्मद दाईफ यांच्याविरोधातही वॉरंट जारी करण्यात आले आहे. वॉरंट जारी करताना, आयसीसीने म्हटले की गाझामधील पॅलेस्टिनींवरील उपासमार आणि अत्याचारांसाठी नेतन्याहू आणि गॅलंट यांना जबाबदार धरण्यासाठी ठोस कारणे आहेत.
वॉरंटमध्ये मोहम्मद दाईफ यांच्यावर ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये सामूहिक हत्या, बलात्कार आणि लोकांना ओलीस ठेवल्याचा आरोप आहे. मात्र, जुलैमध्ये झालेल्या हल्ल्यात मोहम्मद दाईफ ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांसाठी आयसीसीने अटक वॉरंटही जारी केले आहे