युद्ध नको, शांतता हवी
#बाली
रशिया-युक्रेन संघर्षाला आता एक वर्ष उलटत आले आहे. सत्ता, संघर्ष आणि महत्त्वाकांक्षा हिंसाचाराला प्रोत्साहन देते आणि हिंसाचार विनाश घडवून आणतो. युक्रेन आणि रशिया हिंसाचाराला कंटाळून या दोन्ही देशांतील नागरिकांनी इंडोनेशियाच्या राजधानीत आसरा घेतला आहे. आसरा घेणाऱ्यांसाठी इथे एक शांतीग्राम उभारले असून हे नागरिक आपापल्या देशाला युद्ध थांबवण्याचे आवाहन करत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष होत आहे. या दोन्ही देशांतील सर्वसामान्य नागरिकांना हिंसाचाराचा फटका बसला आहे. २ लाखांहून अधिक लोकांना या युद्धाची झळ बसली आहे. युद्धभूमीपासून १० हजार किलोमीटर अंतरावर दूर आसरा घेतलेल्या रशियन आणि युक्रेनमधील नागरिकांनी बालीत शांतीग्राम उभारले आहे.
१४,५०० रशियन आणि ३ हजार युक्रेनियन नागरिकांनी येथे आसरा घेतला आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर सहसा लोक परस्परांशी बोलत नाहीत. मात्र इथे एका तटस्थ ठिकाणी रशिया आणि युक्रेनमधील लोक शांततेने आणि गुण्यागोविंदाने वास्तव्य करत आहेत. यातील बहुतांश नागरिक विविध कंपन्यांत काम करतात. युद्धामुळे आपापला देश सोडून आलेल्या या लोकांनी बालीतील शांतीग्राममधूनच ऑनलाईन पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. युद्ध संपल्यावरही रशियन लोकांना आता रशियात परतण्याची इच्छा राहिलेली नाही, एवढे ते या शांतीग्राममध्ये रमले आहेत. बालीजवळ पार्क उबूद नावाचे एक छोटे शहर वसवण्यात आले आहे. हे शांतीग्राम या पार्क उबूदमध्ये स्थापन करण्यात आले आहे. या शहरात सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. द्वेष नाही, प्रेमभावना महत्त्वाची
रशियन आणि युक्रेनियन लोक इथे मजेत वास्तव्य करत आहेत. ते काम करतात. एकमेकांसोबत गप्पा मारतात. मात्र युद्धाचा विषय कोणीही काढत नाही. युक्रेनियन लोक रशियाबद्दल काही बोलत नाहीत आणि रशियन लोक युक्रेनबाबत काही बोलत नाहीत. त्यांच्या सरकारने हे युद्ध सुरू केले असून सर्वसामान्य लोकांना यांच्याशी काहीच देणेघेणे नसल्याचे रशियन शरणार्थी पोलो तारायूक याचे म्हणणे आहे. विल्यम वेबे यांनी हे पार्क विकसित केले होते. ऑस्ट्रेलिया आणि चिनी पर्यटकांसाठी हे छोटे शहर आम्ही विकसित केले होते. इंडोनेशियाच्या उत्पन्नाचा मोठा भाग पर्यटन व्यवसायातून येतो. त्यामुळे पर्यटनासाठीच हा प्रयोग आम्ही केला होता. मात्र युद्धग्रस्त रशियन आणि युक्रेनियन लोकांना हे शहर आवडेल, अशी आपल्याला कल्पना नव्हती, अशी भावना वेबे यांनी व्यक्त केली आहे. पर्यटन व्यवसायासाठी इंडोनेशिया सरकारने बालीत सेकण्ड होम व्हिसा धोरण लागू केले आहे. या धोरणानुसार लोक कुठलाही विशेष कर न देता ५ ते १० वर्षांसाठी इथे राहू शकतात.