जिनपिंग चीनचे तिसऱ्यांदा अध्यक्ष
#बीजिंग
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या अध्यक्षपदाच्या तिसऱ्या कार्यकाळावर नॅशनल पीपल्स काँग्रेस या संसद सभागृहाने शिक्कामोर्तब केले. त्यांच्या अध्यक्षपदास मान्यता देण्याच्या ठरावाच्या बाजूने २९५२ मते पडली. कम्युनिस्ट पक्षाच्या एकाही सदस्याने ठरावाच्या विरोधात मतदान केले नाही. जिनपिंग यांच्यासमोर ढासळणारी अर्थव्यवस्था, अमेरिका आणि तैवानबरोबरचे खालावत जाणारे संबंध ही प्रमुख आव्हाने आहेत.
गेल्या ऑक्टोबरमध्ये जिनपिंग हे तिसऱ्या वेळा राष्ट्राध्यक्ष होणार हे नक्की झाले होते. त्या वेळी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने एकमताने जिनपिंग यांच्या निवडीस मान्यता दिली होती. आता जिनपिंग हे आपल्या विश्वासातील ली कियांग यांना पंतप्रधान बनवतील.
बीजिंगमध्ये झालेल्या कार्यक्रमात जिनपिंग यांनी चीनला सामर्थ्यशाली, सुखी-समाधानी आणि समाजवादी देश बनवण्याचे देशाला आश्वासन दिले. या वेळी त्यांनी डाव्या हातात देशाच्या घटनेची प्रत ठेवली होती. त्यावर हात ठेवून त्यांनी शपथ घेतली. तिसऱ्यांदा अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळालेले जिनपिंग आता सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले आहेत. या अगोदर माओ यांनी सर्वाधिक काळ देशाचे नेतृत्व केले होते. जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली ली कियांग यांनी कोरोना संकटातून देशाला बाहेर काढले होते. त्यामुळे जिनपिंग आता कियांग यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सुपूर्द करतील. अध्यक्षपदाबरोबर जिनपिंग आता पीपल्स आर्मी लिबरेशनचे कमांडर हे पदही सांभाळतील. अध्यक्षपदाच्या तिसऱ्या कार्यकाळावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी एक दिवस अगोदर भविष्यात आपली कशाला प्राथमिकता असेल यावर जिनपिंग यांनी भाष्य केले होते. सामर्थ्यवान संरक्षण दलाच्या निर्मितीस आपले प्राधान्य असेल असे सांगून ते म्हणाले होते की, आपल्याला संरक्षण दलाचा वेगाने विस्तार करायला हवा. देशासमोरील धोरणात्मक आव्हाने आणि संकटापासून देशाचे रक्षण करण्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मी जगातील एक नंबरची आर्मी बनवावी लागेल. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने गेल्या आठवड्यात आपल्या संरक्षण खात्याच्या अंदाजपत्रकात मोठी वाढ केली होती. संरक्षणावर २०२३ या वर्षी चीन १८ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. संरक्षण खात्याच्या अंदाजपत्रकात ७.२ टक्क वाढ करण्यात आली आहे. जिनपिंग यांच्यासमोर ढासळणारी अर्थव्यवस्था आणि अमेरिका आणि तैवानबरोबरचे खालावत जाणारे संबंध ही प्रमुख आव्हाने आहेत. २०१२ मध्ये जिनपिंग यांनी प्रथम अध्यक्षपद स्वीकारले तेव्हा चीनला जगातील महासत्ता बनवण्याचे स्वप्न जनतेला दाखवले होते.
वृत्तसंंस्था