जर्मनीत आढळला दुसरा महायुद्धकालीन बॉम्ब
#डसेलडॉर्फ
जर्मनीतील डसेलडॉर्फमध्ये सोमवारी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब सापडला. यानंतर शहरातील १३ हजार लोकांना तात्पुरते घर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमेरिकेत बनवलेल्या या बॉम्बचे वजन ५०० किलो आहे. डीडब्ल्यूने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्बपथक घटनास्थळी असून, ते बॉम्ब निकामी करण्याचे काम करत आहेत.
प्राणिसंग्रहालयाजवळ काम करणाऱ्या कामगारांना हा बॉम्ब सापडला. यानंतर घटनास्थळापासून ५०० मीटरच्या परिसरातून लोकांना हटवण्यात आले आणि आजूबाजूचे रस्ते बंद करण्यात आले. शहरातील २ शाळांमध्ये लोकांना हलवण्यात आले. शहरातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. याशिवाय लोकल बस आणि ट्राम सेवाही बंद करण्यात आली होती.
२०२१ मध्ये सापडले होते बॉम्ब
जर्मनीतील अनेक शहरांमध्ये बांधकामाच्या ठिकाणी काम करताना असे बॉम्ब सापडतात. याआधी २०२१ मध्ये म्युनिकमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्बचा स्फोट झाला होता, त्यात ४ जण जखमी झाले होते आणि २०२० मध्ये, फ्रँकफर्टमध्ये ब्रिटिश बॉम्ब सापडल्यानंतर, सुमारे १३ हजार लोकांना घरे तात्पुरती सोडावी लागली. २०१७ मध्ये फ्रँकफर्टमध्येच १४०० किलो वजनाचा बॉम्ब सापडला होता, त्यानंतर सुमारे ६५ हजार लोकांना आपले घर सोडावे लागले होते. दुसऱ्या महायुद्धात, १९४० ते १९४५ दरम्यान, यूएस आणि यूकेच्या हवाई दलांनी युरोपवर सुमारे २७ लाख टन बॉम्ब टाकले. यापैकी निम्म्याहून अधिक बॉम्ब जर्मनीत पडले.
दुसरे महायुद्ध
१ सप्टेंबर १९३९ रोजी दुसरे महायुद्ध सुरू झाले. सुमारे ६ वर्षे चाललेल्या या युद्धात ७ ते ८ कोटी लोक मारले गेले. १ सप्टेंबर रोजी हिटलरच्या नेतृत्वाखाली जर्मनीने पोलंडवर कब्जा करण्याच्या उद्देशाने हल्ला केला. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या ब्रिटन आणि फ्रान्सने पोलंडला मदतीचा हात पुढे केला. यानंतर जर्मनीच्या बाजूने इटली आणि जपान हे देश आमनेसामने आले, तर फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि काही प्रमाणात चीन हे पोलंड समोरासमोर आले. त्यानंतर या युद्धाचे महायुद्धात रूपांतर झाले. हे युद्धही पहिल्या महायुद्धाप्रमाणे दोन गटांमध्ये लढले गेले. जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने ३० एप्रिल १९४५ रोजी जर्मनी युद्धात हरल्याचे पाहून आत्महत्या केली.
वृत्तसंंस्था