संग्रहित छायाचित्र
तेल अविव : इस्राएल आणि हमास यांचे युद्ध सुरू होऊन आठ महिने झाले आहेत. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्राएलवर हमासच्या अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर इस्राएलने गेले आठ महिने गाझापट्टी संपूर्ण भाजून काढली आहे. आताही जगाच्या अनेक देशांनी मध्यस्थी करूनही हे युद्ध काही थांबायचे नाव घेत नाही. आता देशातील महिलांनी सध्या वेगळाच निर्णय घेतला आहे. इस्राएलच्या ४२ हजार महिलांनी गन परमिटसाठी सरकारकडे अर्ज केला आहे.
हमासच्या अतिरेक्यांनी गेल्या वर्षी केलेल्या हल्ल्यानंतर इस्राएलच्या महिला स्वत: असुरक्षित समजत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. ४२ हजार महिलांनी गनसाठी परवाना मिळावा असा अर्ज केला आहे. तेथे आता १८ हजार अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. जेव्हापासून इस्राएलमध्ये उजव्या विचारांचे सरकार आले आहे. तेव्हापासूनच नेत्यान्याहू यांच्या सरकारने स्व-संरक्षणासाठी गन खरेदीचे नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे महिला आता पुढे येऊन बंदुकी खरेदीसाठी अर्ज करीत आहेत.
सध्या इस्राएलमध्ये १५ हजारांहून अधिक महिलांकडे बंदूक आहे. तर दहा हजार महिला बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. आपल्या सुरक्षेसंदर्भात महिला आता अधिक चिंतीत झाल्या आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर आपल्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे यासाठी महिलांची पहिली प्राथमिकता झाली आहे. त्यामुळे बंदुकीला स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी जास्त जवळ केले जात आहे. परंतु प्रत्येकाला ही बंदूक संस्कृती पसंद नाही अनेकजण या निर्णयामुळे नाराजदेखील आहेत. त्यामुळे या धोरणावर टीकादेखील होत आहे. दरम्यान गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या अतिरेक्यांनी मोटर पॅराग्लायडिंगच्या मदतीने आकाशातून प्रवेश करीत इस्राएलवर मोठा हल्ला केला. यावेळी अनेक इस्राएली महिला आणि मुलांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवण्यात आले होते. यात सैनिकांचा देखील समावेश होता. या हल्ल्याने इस्राएलच्या भक्कम सुरक्षेचे दावे पोकळ निघाले. त्यानंतर अपमान झालेल्या इस्राएलने हमासला संपवण्याची शपथ घेतली आणि युद्धाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी मृत्यूचे आकडे माणुसकीला लाजवणारे आहेत. इस्राएलच्या इतक्या मोठ्या कारवाईनंतरही हमास संपूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे युद्ध आता कोणत्या वळणावर जाते याची भीती सर्वांना लागली आहे.