रशियाला मिळणार नवे राष्ट्राध्यक्ष?
#मॉस्को
युक्रेनविरुद्धच्या युद्धामुळे जगभरात बदनाम झालेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आता अंतर्गत कलहामुळे संकटात सापडले आहेत. पुतीन यांचा एकेकाळचे घनिष्ठ सहकारी, उद्योगपती आणि रशियातील भाडोत्री लष्करी गट 'वॅगनर' चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनीच त्यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.रशिया-युक्रेन युद्ध सुरू ठेवण्याचा निर्णय या तास पसंत नसल्याची चर्चा आहे. शनिवारी वॅगनर या भाडोत्री लष्कराच्या गटाने पुतीन यांच्याविरोधात बंड पुकारले. यानंतर पुतीन यांनीही या सैनिकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियाला लवकरच नवे राष्ट्राध्यक्ष मिळतील, अशी घोषणा केली आहे.
युक्रेनमध्ये तैनात केलेल्या वॅगनर गटाने पुतीन यांच्या धोरणास विरोध दर्शवला आहे. ही बातमी पुतीन यांच्या कानावर पडताच त्यांनी हा देशद्रोह असून असा गुन्हा करणाऱ्यांना माफ करणार नसल्याची धमकी दिली आहे. या धमकीला उत्तर म्हणून या गटाने थेट राष्ट्राध्यक्ष बदलाचीच भाषा सुरु केली आहे. रशियामध्ये सध्या सैन्याने केलेल्या सशस्त्र उठावामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुतीन यांनी आपल्या भाषणात या उठावाला देशद्रोह म्हटले होते.
तसेच आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आपण सोडणार नाही, असेही ते म्हणाले होते. मात्र, इथेच त्यांचे चुकले, असे वॅगनर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी म्हटले आहे. पुतीन यांनी आपल्या भाषणात चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशाला लवकरच नवीन राष्ट्राध्यक्ष मिळतील, असे भाकीतही
येवगेनी यांनी वर्तवले आहे. याशिवाय रशियातील दोन मोठ्या शहरांवर आपण ताबा मिळवला असल्याचा दावा या गटाने केला आहे. येवगेनी यांचा वॅगनर गट सध्या मॉस्कोच्या दिशेने कूच करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या दरम्यान त्यांनी रशियाचे तीन हेलिकॉप्टर पाडल्याचा दावाही केला आहे. आपल्याला रशियाच्या सैनिकांनी थोडा प्रतिकार केला, मात्र तरीही आपण पुढे जात असल्याची माहिती या गटाने दिली आहे.
सेना मुख्यालयात येवगेनी
वॅगनर या लष्करी गटाला युक्रेनमध्ये तैनात करण्यात आले होते. मात्र, आता आपण रशियातील एका महत्त्वाच्या लष्करी मुख्यालयात असल्याचा दावा येवगेनी यांनी केला आहे. त्यांनी स्वतःचा एक व्हीडीओही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते रशियाच्या लष्करी मुख्यालयात दिसत आहेत. दरम्यान यावर प्रतिक्रिया म्हणून या येवगेनी प्रिगोझिन यांच्या अटकेचे आदेश पुतीन यांनी दिले आहेत. सोबतच, रशियाने दहशतवादविरोधी कृती गटाची घोषणा केली आहे.
वृत्तसंस्था