रुपर्ट मर्डोक पुन्हा बोहल्यावर...

जगातील ख्यातनाम उद्योगपती आणि 'फॉक्स न्यूज'चे मालक रुपर्ट मर्डोक पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. मर्डोक आणि त्यांचे आजवरील विवाहसंबंध हा जगासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र मर्डोक आता वयाच्या ९२ व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडले आहेत. या प्रेमिकेसोबत ते विवाहसुद्धा करणार आहेत. आता मर्डोक पाचव्यांदा लग्नाला उभे राहणार म्हटल्यावर त्याची तयारीही जोरदार होणारच.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 22 Mar 2023
  • 11:55 am
रुपर्ट मर्डोक पुन्हा बोहल्यावर...

रुपर्ट मर्डोक पुन्हा बोहल्यावर...

लेस्ली स्मिथसोबत पाचव्या लग्नाची तयारी सुरू, वयाच्या ९२ व्या वर्षी पुन्हा पडले प्रेमात

#वॉशिंग्टन

जगातील ख्यातनाम उद्योगपती आणि 'फॉक्स न्यूज'चे मालक रुपर्ट मर्डोक पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. मर्डोक आणि त्यांचे आजवरील विवाहसंबंध हा जगासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र मर्डोक आता वयाच्या ९२ व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडले आहेत. या प्रेमिकेसोबत ते विवाहसुद्धा करणार आहेत. आता मर्डोक पाचव्यांदा लग्नाला उभे राहणार म्हटल्यावर त्याची तयारीही जोरदार होणारच. त्यामुळे रुपर्ट मर्डोक आणि त्यांची ६६ वर्षीय प्रेमिका एन लेस्ली स्मिथ यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

रुपर्ट मर्डोक यांनी नुकतेच आपल्या चौथ्या पत्नीपासून काडीमोड घेतला आहे, सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर सात महिन्यांनी मर्डोक पुन्हा प्रेमात पडले आहेत. त्यांची पाचवी वधू एन लेस्ली स्मिथ ही पोलीस धर्मोपदेशक आहे. मर्डोक यांचा तिच्यासोबत साखरपुडा पार पडला आहे. यावेळी अंगठी घालताना त्यांनी आपण पुन्हा कसे प्रेमात पडलो, याची उत्कंठावर्धक कहाणी माध्यमांसमोर उघड केली आहे.  

आता हे शेवटचे लग्न

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, रुपर्ट मर्डोक यांनी, आता हे बहुदा माझे शेवटचे लग्न ठरेल, असे सांगितले आहे. मी खूप भयभीत झालो होतो. मी पुन्हा नव्याने प्रेमात पडलो आहे की काय? या शक्यतेमुळे गांगरून गेलो होतो. पुन्हा प्रेमात पडण्याची भीती वाटत होती. मात्र शेवटी ते घडले आणि मी एन लेस्ली स्मिथच्या प्रेमात पडलो. आता हे माझे अखेरचे लग्न आहे, असा दावा त्यांनी माध्यमांसमोर केला आहे. मात्र माध्यमसम्राट रुपर्ट यांनी आजवर चार वेळा विवाह केलेला आहे. दरवेळी ते कोणाच्या तरी प्रेमात पडतात, मग लग्न करतात आणि काही काळानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येतात.  

मर्डोक यांचे हे पाचवे लग्न

यापूर्वी मर्डोक यांनी चार वेळा विवाह केलेला आहे. जेरी हॉल, वेंडी मर्डोक, ॲना मर्डोक मान आणि पॅट्रिशिया बुकर या त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी आहेत. या सगळ्यांशी त्यांचे संबंध प्रेमाचे राहिले होते. घसघशीत पोटगी देऊन त्यांनी या चारही बायकांपासून काडीमोड घेतलेला आहे. त्यांचा पहिला विवाह २०१६ साली जेरी हॉलसोबत झाला होता. जेरी ही सुपरमॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. तिला तिच्या पहिल्या विवाहापासून चार मुले आहेत. मर्डोक यांनी दुसरे लग्न वेन्डी डेंगशी केले. वेन्डी चिनी आहे. व्यवसायाने पत्रकार असलेल्या आणि वयाने ३० वर्षांनी लहान वेन्डीशी त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. त्यांनतर मर्डोक यांनी ॲना टोर्व्ह हिच्याशी लग्न केले. हीसुद्धा पत्रकारच होती. मर्डोकसोबत लग्न केल्यावर ती रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली. त्यानंतर मर्डोक यांनी पॅट्रिशिया बुकरसोबत लग्न केले. बुकर ही ऑस्ट्रेलियन फ्लाईट अटेंडंट होती. तिचाही घटस्फोट झालेला होता. मर्डोक यांनी तिच्याशी काडीमोड घेतला आणि आता लेस्लीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मर्डोक यांचे पाचवे लग्न किती दिवस टिकते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest