फुकटच्या पैशांवर पर्यटन कसले करता?
#लाहोर
देश आर्थिक संकटाला सामोरे जात आहे, लोकांकडे खायला अन्न नाही आणि आमचे परराष्ट्रमंत्री फुकटच्या पैशांवर मजा मारत फिरत आहेत. पंतप्रधान इंग्लंडमध्ये राज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावतात आणि भुट्टो भारतात जाऊन पाकिस्तानची इज्जत धुळीस मिळवत आहेत. हा सार्वजनिक पैशांचा अपव्यय नाही का, असा सवाल उपस्थित करत माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भुट्टो यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे दहशतवाद उद्योगाचे प्रवर्तक, समर्थक आणि प्रवक्ते आहेत, असा आरोप भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ५ मे रोजी ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) परिषदेतील बैठकीनंतर केला. याचे पडसाद आता पाकिस्तानातही उमटू लागले आहेत. याचा संदर्भ देत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बिलावल भुट्टो यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. लाहोरमध्ये पक्षाच्या एका मेळाव्याला संबोधित करताना इम्रान खान यांनी सध्याच्या सरकारला धारेवर धरले आहे. जगभरात पाकिस्तानची नाचक्की होत आहे. बिलावल भुट्टो तुम्ही संपूर्ण जगाचा दौरा करत आहात, पण त्याआधी सांगा की देशाचा पैसा दौऱ्यावर उडवण्या आधी कोणाला विचारता, या दौऱ्याचा फायदा किंवा तोटा काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भारतात जाऊन भारताकडून देशाची प्रतिष्ठा मातीत मिसळवण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली, असेही इम्रान खान म्हणाले आहेत.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर काय म्हणाले होते?
एससीओ सदस्य देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून भुट्टो यांना त्यांच्या पदाप्रमाणे वागणूक दिली गेली. पाकिस्तानचा मुख्य आधार असलेल्या दहशतवाद उद्योगाचा प्रवर्तक, समर्थक आणि प्रवक्ता असा त्यांचा उल्लेख आम्ही केला आणि बैठकीतच त्यांच्या वक्तव्याचा प्रतिवाद करण्यात आला, असे जयशंकर यांनी पत्रकारांना सांगितले. दहशतवादपीडित दहशतवादाच्या प्रवक्त्यांशी चर्चा करू शकत नाही, असे खडेबोलही जयशंकर यांनी भुट्टो यांना ‘एससीओ’ परिषदेत सुनावले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील,असा पुनरुच्चारही जयशंकर यांनी केला. दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानची विश्वासार्हता त्याच्या परकीय गंगाजळीपेक्षाही वेगाने घसरत आहे, असा टोलाही जयशंकर यांनी पाकिस्तानला लगावला.