अभ्यासासाठी गेले आणि स्वतःच बुडाले
#वाॅशिंग्टन
एखादी व्यक्ती, वस्तू अथवा वास्तूबद्दल ती दुर्दैवी असल्याचे बोलले जाते. आजच्या आधुनिक विज्ञानवादी जगात यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र त्यातील तथ्यही कोणी नाकारू शकणार नाही. टायटॅनिक या जगप्रसिद्ध जहाजाबद्दलही तसेच घडले आहे. हे मोठे जहाज दुर्दैवाने १९१२ ला बुडाले आणि आता या जहाजाचा अभ्यास करायला गेलेली पाणबुडी बेपत्ता झाली आहे. म्हणजे दुर्दैव अजून टायटॅनिकची पाठ सोडायला तयार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.
टायटॅनिक या जहाजाबद्दल कोणाला माहिती नाही, असे कसे शक्य होईल बरे. समुद्रात बुडालेल्या या जहाजाबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. या घटनेवर आधारित 'टायटॅनिक' हा हॉलिवूडपटही खूप लोकप्रिय आहे. टायटॅनिक हे त्या काळातले सर्वात आधुनिक आणि मोठे जहाज होते, जे अटलांटिक महासागरात बुडाले. पाण्याखाली तब्बल ३८०० मीटर खोलवर या जहाजाचे सांगाडे असल्याचे सांगितले जाते. हे जहाज बुडाले असले तरी त्याबद्दल संपूर्ण जगाला खूप कुतूहल आहे. पाण्याखाली असलेल्या या जहाजाचे अवशेष पर्यटकांना दाखवण्यासाठी गेलेली एक पाणबुडी उत्तर अटलांटिक समुद्रात हरवली आहे. काही जण दावा करू लागले आहेत की, ही पाणबुडीदेखील बुडाली असावी.
ही पाणबुडी पाच पर्यटकांना घेऊन जात होती. टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी जात असलेली ही पाणबुडी हरवली आहे. रविवारपासून या पाणबुडीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता ही पाणबुडी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकन तटरक्षक दलाकडून ही पाणबुडी शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. लवकरात लवकर या पाणबुडीचा शोध घेण्याचे आव्हान बचाव पथकासमोर आहे. कारण त्या पाणबुडीत केवळ ७० तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक आहे.
ही पाणबुडी 'ओशियनगेट एक्पीडिशन' या कंपनीकडून ऑपरेट केली जाते. ही कंपनी खोल समुद्रात अनेक मोहिमा राबवते. टायटॅनिक जहाज १९१२ मध्ये हिमनगाला धडकल्याने बुडाले होते. समुद्राखाली असलेल्या टायटॅनिकच्या अवशेषांबद्दल पर्यटकांना खूप कुतूहल असते. हे अवशेष पाहण्यासाठी पर्यटक कंपनीला पैसे देऊन त्यांच्या पाणबुडीने समुद्राच्या तळाशी जातात आणि टायटॅनिकचे अवशेष पाहतात. या आठ दिवसांच्या टूरसाठी अडीच लाख डॉलर्स खर्च करावे लागतात. या पाणबुडीत सध्या ५ व्यक्ती आहेत. यात एक चालक, तीन पर्यटक आणि एक कंटेंट एक्सपर्ट आहे. दरम्यान ही पाणबुडी शोधण्यासाठी अमेरिकेसह, कॅनडाच्या नौदलांनी बचाव मोहिमा सुरू केल्या आहेत.