Ukrain : आमची चूक झाली, आम्हाला माफ करा

संरक्षण मंत्रालयाच्या कडून झालेल्या काली मातेच्या अवमानप्रकरणी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही भारतीय संस्कृतीचा आदर करतो. भारतीयांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, संरक्षण मंत्रालयाने केलेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागत असल्याचे स्पष्ट करत युक्रेनच्या परराष्ट्र राज्यमंत्री एमिन डेजेपर यांनी या वादावर पडदा टाकला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 3 May 2023
  • 03:49 pm
आमची चूक झाली, आम्हाला माफ करा

आमची चूक झाली, आम्हाला माफ करा

कालीमाता अवमानप्रकरणी युक्रेनने व्यक्त केली दिलगिरी; परराष्ट्र राज्यमंत्री एमिन डिजेपर यांनी ट्विट करत मागितली माफी

#कीव

संरक्षण मंत्रालयाच्या कडून झालेल्या काली मातेच्या अवमानप्रकरणी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही भारतीय संस्कृतीचा आदर करतो. भारतीयांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, संरक्षण मंत्रालयाने केलेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागत असल्याचे स्पष्ट करत युक्रेनच्या परराष्ट्र राज्यमंत्री एमिन डेजेपर यांनी या वादावर पडदा टाकला आहे.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने एक फोटो ट्विट केला होता. त्यामुळे भारतीयांचा संताप अनावर झाला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काली मातेचा आक्षेपार्ह फोटो शेअर करण्यात आला. भारतातील ट्विटर वापरकर्त्यांनी याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे पत्राद्वारे कारवाई करण्याची मागणी केली होती. युक्रेन सरकारने हेतुतः भारतीयांना श्रद्धास्थानी असलेल्या काली मातेचे आक्षेपार्ह छायाचित्र ट्विटरवरून प्रसारित केले असल्याची तक्रार जयशंकर यांच्याकडे करण्यात आली. तसेच भारत सरकारने त्वरित युक्रेन सरकारकडे याबाबत खुलासा मागावा आणि दिलगिरी व्यक्त करायला भाग पाडावे, अशी मागणी करण्यात आली होती.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या @DefenceU या अधिकृत ट्विटर हँडलने ३० एप्रिलला ट्विट केलेला फोटो 'वर्क ऑफ आर्ट' या कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये काली मातेची प्रतिमा ही हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मन्रोच्या पोजमध्ये दाखवण्यात आली होती.  स्फोटातून निघालेल्या धुरात काली मातेचा  चेहरा मर्लिन मन्रोसारखा दिसत आहे. तिची जीभ बाहेर आहे आणि तिच्या गळ्यात कवटीचा हार दिसत आहे. या फोटोमुळे संताप व्यक्त केला.  भारतातील संतप्त नेटकऱ्यांनी हा प्रकार आक्षेपार्ह आणि 'हिंदूफोबिक' असल्याचे म्हटले आहे. भारतातील अनेक संतप्त ट्विटर वापरकर्त्यांनी थेट ट्विटर सीईओ इलॉन मस्क आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना टॅग केले होते. तसेच वापरकर्त्यांनी दोघांकडे युक्रेनवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने काही वेळातच हा फोटो आणि ट्विट काढून टाकले. पण तोपर्यंत त्याचा स्क्रीन शॉट व्हायरल झाला होता.

दरम्यान रशियासोबत सुरू असलेल्या युद्धामुळे अडचणीत असलेल्या युक्रेनने जाहीर दिलगिरी व्यक्त करत हा विषय संपवण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या संरक्षण मंत्रालयाकडून काली मातेची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आली, याचा आम्हाला खेद आहे. आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत. युक्रेन सरकार आणि युक्रेनमधली सर्वसामान्य जनता भारताच्या संस्कृतीचा नेहमीच आदर करत आलेली आहे. भारताने आजवर केलेल्या सहकार्याची आम्हाला जाण आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest