पोलादी पुतिनसमोर वॅगनरचे लोटांगण
#मॉस्को
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवलेल्या भाडोत्री लष्कराचे प्रमुख प्रिगोझिन येवगेनी यांनी पुतीन यांच्यासमोर नांगी टांगली असून बंडखोर सैनिकांच्या जिवाची हमी मिळण्याच्या मोबदल्यात त्यांनी सपशेल शरणागती पत्करली आहे. त्यामुळे पुतीन यांच्या एककल्ली कारभाराला कंटाळलेल्या राजकीय कार्यकर्त्यांची, त्यांच्या विरोधकांची आणि रशियात पुतीन यांच्या विरोधात काम करणाऱ्या छुप्या गटांची घोर निराशा झाली आहे. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांनी त्यासाठी मध्यस्थी केली असून शनिवारी (२४ जून) मध्यरात्री याबाबतची घोषणा त्यांनी केली.
पुतीन यांचे घनिष्ठ सहकारी, उद्योगपती आणि रशियातील भाडोत्री लष्करी गट 'वॅगनर' चे प्रमुख प्रिगोझिन येवगेनी यांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले होते. रशिया-युक्रेन युद्ध सुरू ठेवण्याच्या निर्णयावरून त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चा होती. शनिवारी वॅगनर या भाडोत्री लष्कराच्या गटाने पुतीन यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यासोबतच प्रिगोझिन येवगेनी यांनी रशियाला लवकरच नवे राष्ट्राध्यक्ष मिळतील, अशी घोषणा केली होती. त्यानंतर देशाला संबोधित करताना
पुतीन यांनी येवगेनी आणि वॅगनर गटाला थेट इशारा दिला. हा सशस्त्र उठाव म्हणजे आपल्या आणि देशाच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे. त्यामुळे गद्दारांवर आपण कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे प्रिगोझिन येवगेनी यांनी तत्काळ माघार घेतली आहे.