Russia Victory Day : रशियात 'व्हिक्ट्री डे' मोठ्या उत्साहात साजरा

दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनने नाझी जर्मनीचा पराभव केला या विजयाचे औचित्य साधून रशियात दरवर्षी ९ मे रोजी 'व्हिक्ट्री डे' साजरा करण्यात येतो. यंदा मंगळवारी मोठ्या उत्साहात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन परेड आयोजित करण्यात आलेल्या रेड स्क्वेअरवर पोहोचले. ते आपल्या १० मिनिटांच्या भाषणात म्हणाले, की, नाझींच्या पराभवानंतर ७८ वर्षांनी रशिया व संपूर्ण जग पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. रशियाविरोधात खऱ्या युद्धाला सुरुवात झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 10 May 2023
  • 01:51 am
रशियात 'व्हिक्ट्री डे' मोठ्या उत्साहात साजरा

रशियात 'व्हिक्ट्री डे' मोठ्या उत्साहात साजरा

#मॉस्को

दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनने नाझी जर्मनीचा पराभव केला या विजयाचे औचित्य साधून रशियात दरवर्षी ९ मे रोजी 'व्हिक्ट्री डे' साजरा करण्यात येतो. यंदा मंगळवारी मोठ्या उत्साहात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन परेड आयोजित करण्यात आलेल्या रेड स्क्वेअरवर पोहोचले. ते आपल्या १० मिनिटांच्या भाषणात म्हणाले, की, नाझींच्या पराभवानंतर ७८ वर्षांनी रशिया व संपूर्ण जग पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. रशियाविरोधात खऱ्या युद्धाला सुरुवात झाली आहे.

पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाची तुलना नाझींसोबतच्या युद्धाशी केली. ते म्हणाले, 'युक्रेनचे नेते जगाचे नवे नाझी आहेत. युक्रेन युद्धाने जागतिक समुदायाला 'ब्रेकिंग पॉईंट'वर आणले आहे. रशियाची शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा आहे, पण पाश्चिमात्य देशांना हे नको आहे. ते नागरिकांत सातत्याने द्वेष व रुसोफोबिया (रशियाविरुद्ध द्वेष आणि भीती) यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांना केवळ आपला देश नष्ट करायचा आहे. युक्रेनची जनता पाश्चात्य देशांच्या दुष्ट योजनांची गुलाम झाली आहे.'

एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या ६ देशांनीही या सोहळ्यात भाग घेतला होता. कझाकिस्तान, किर्गिस्तान, आर्मेनिया, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान व बेलारूसचे नेते पुतिन यांच्यासोबत दिसले. रेड स्क्वेअरवर दुसऱ्या महायुद्धात मरण पावलेल्या रशियन सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वेळी १२५ लष्करी वाहने व १० हजार रशियन सैनिकांचे संचलन झाले. यात रशियाची आंतरखंडीय क्षेपणास्त्र व एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचाही समावेश होता. काही दिवसांपूर्वी क्रेमलिनवर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा परेडमध्ये लष्करी फ्लायपास्ट काढण्यात आला नाही. 

भाषणाच्या सुरुवातीला पुतिन यांनी परेडमध्ये सहभागी झालेल्या सर्व सहकारी देशांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ एक मिनिट मौन पाळण्याची घोषणा केली. पुतिन म्हणाले, देशासाठी सैनिक हे युद्धाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. युक्रेनमध्ये रशियाच्या विशेष लष्करी कारवाईचा भाग असलेल्या सैनिकांचा मला अभिमान आहे. रशियाचे भविष्य या सैनिकांवरच अवलंबून आहे. 

तत्पूर्वी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाची तुलना नाझींशी केली. युरोप दिनानिमित्त एक व्हीडीओ संदेश जारी करताना झेलेन्स्की म्हणाले, दुसऱ्या महायुद्धात ज्याप्रमाणे नाझींचा पराभव झाला, त्याचप्रमाणे दुष्ट रशियालाही या युद्धात पराभवाला सामोरे जावे लागेल. तेव्हा आम्ही मिळून वाईट गोष्टींचा अंत केला. आताही तेच करू. रशिया नवीन वाईट गोष्टींना प्रोत्साहन देत आहे, पण आम्ही त्यांना नाझींसारखे संपवून टाकू.'

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest