व्लादिमीर पुतीन यांच्या प्रकृतीबाबत अफवांचे पीक
#मॉस्को
रशिया-युक्रेन युद्धाला येत्या २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होईल. या युद्धानिमित्त रशिया प्रतिस्पर्धी शक्तींशी दोन हात करण्यात गुंतला आहे. अशा वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांना जोर चढला आहे. हेरगिरीत आणि मुत्सद्देगिरीत प्रवीण असणारे पुतीन आपले क्लोन वापरतात, डुप्लिकेट वापरतात, अशा वावड्या यापूर्वीही उडत आलेल्या आहेत. मात्र सध्या पुतीन यांच्या गंभीर आजाराची चर्चा रंगली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पार्किन्सन अथवा रक्ताचा कर्करोग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून पुतीन आता केवळ काही दिवसांचेच पाहुणे उरले असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी प्रतिस्पर्धी गुप्तहेर संस्थांच्या तज्ज्ञांच्या वक्तव्याचा हवाला दिला जात आहे.
ब्रिटनच्या हेरखात्याचे माजी प्रमुख सर रिचर्ड डियरलोव यांनी तसा दावा केला आहे. जागतिक प्रसारमाध्यमांच्या पत्रकार परिषदेत सर रिचर्ड डियरलोव यांनी हा दावा केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन एका जीवघेण्या आजाराला सामोरे जात आहेत. पुतीन हे अखेरच्या घटका मोजत असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. लवकरच त्यांच्या अत्याचारी राजवटीचा अंत होणार असल्याचे सर रिचर्ड डियरलोव यांचे म्हणणे आहे. पुतीन यांचा लालबुंद चेहरा आणि हावभावावरून प्रसारमाध्यमे काहीतरी तर्क काढतात आणि अशा अफवा सोडून देत असल्याचे रशियन माध्यमांचे म्हणणे आहे.