अमेरिकेची आयफोनद्वारे हेरगिरी
#मॉस्को
अमेरिका हेरगिरी करण्यासाठी आयफोन हॅक करत असल्याचा दावा करीत रशियाने शुक्रवारी (दि. २) जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडवून दिली. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने (एफएसबी) दिलेल्या माहितीनुसार, या फोनमधील अमेरिकन पाळत ठेवणारी यंत्रणा त्यांनी उघड केली आहे. अमेरिकन हॅकर्सनी या हेरगिरी मोहिमेत इस्राएल, सीरिया, चीन आणि नाटो सदस्यांच्या राजदूतांचे फोन हॅक केल्याचा गंभीर आरोप रशियाने केला आहे.
अनेक स्थानिक रशियन लोक आणि सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या देशांमध्ये काम करणाऱ्या राजनयिक अधिकाऱ्यांचेही फोन हॅक करण्यात आले होते. अमेरिकेची विशेष सेवा हे गुप्तचर ऑपरेशन राबवत होती. अमेरिकेची नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (एनएसए) आणि अॅपल कंपनी यांच्यात जवळचे सहकार्य असल्याचा दावाही रशियन एजन्सी एफएसबीने केला आहे.
एनएसएने याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला. दुसरीकडे, मॉस्कोस्थित कॅस्परस्की लॅब कंपनीने सांगितले की, ‘‘या ऑपरेशनद्वारे त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या उपकरणांशी छेडछाड करण्यात आली.’’ कॅस्परस्कीने एका ब्लॉगमध्ये म्हटले - हेरगिरीचे पुरावे पहिल्यांदा २०१९ मध्ये सापडले होते आणि ते आतापर्यंत सुरू आहे. मात्र, आपण या सायबर हल्ल्याचे मुख्य लक्ष्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एफएसबी हे केजीबीचे नवे रूप
फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस रशियाची प्रमुख सुरक्षा एजन्सी आहे आणि सोव्हिएत युनियनच्या काळातील कुख्यात गुप्तचर यंत्रणा केजीबीची मुख्य उत्तराधिकारी आहे.
तिची स्थापना १९९५ मध्ये बोरिस येल्तसिन यांनी केली होती. त्याचे मुख्यालय मॉस्को येथे आहे. याचे प्रमुख अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह आहेत. ते रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना थेट रिपोर्टिंग करतात.
आम्ही हे केले नाही आणि करणारही नाही : ॲपल
आम्ही हे कधीही केले नाही आणि करणारही नाही, असे स्पष्टपणे सांगत ॲपल कंपनीने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. रशियाने हे आरोप केले असले तरी अॅपल कंपनीला या हेरगिरीची माहिती असल्याचा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही. एफएसबीचे आरोप फेटाळून लावताना अॅपल कंपनी म्हणते, ‘‘आम्ही कधीही कोणत्याही देशाच्या सरकारच्या सहकार्याने फोनशी छेडछाड केली नाही आणि करणारही नाही.’’
रशियाने दिले आपल्या अधिकाऱ्यांना आयफोन न वापरण्याचे आदेश
रशियाचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, ‘‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसच्या माहितीवरून हे सिद्ध होते की अमेरिकेत बनवलेले आयफोन सुरक्षित नाहीत. त्यातील माहिती इतरांपर्यंत पोहचते, इतके ते पूर्णपणे पारदर्शक आहेत. त्यांच्यावर सायबर हल्ला करून मोठ्या प्रमाणावर डाटा गोळा केला जात होता. यूएस इंटेलिजन्स एजन्सी अनेक वर्षांपासून आयटी कंपन्यांचा वापर करून इंटरनेट वापरकर्त्यांचा डेटा त्यांच्या नकळत गोळा करत आहे.’’ हार्वर्ड विद्यापीठाच्या बेल्फर सेंटर सायबर २०२२ पॉवर इंडेक्सनुसार सायबर पॉवरमध्ये अमेरिका आघाडीवर आहे. त्यानंतर चीन, रशिया, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. यापूर्वी, क्रेमलिनने रशियातील २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना आयफोन वापरणे थांबवण्यास सांगितले होते. यातून अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा रशियावर लक्ष ठेवून असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती.
वृत्तसंस्था