न्यूझीलँडमध्ये गोळीबारात दोन मृत्युमुखी
#ऑकलँड
महिला फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमध्ये केले जात आहे. न्यूझीलंड आणि नॉर्वे यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी एका घटनेने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. नॉर्वे टीमच्या हॉटेलजवळ गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. उद्घाटनाच्या सामन्याच्या काही तासांपूर्वी ही घटना घडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
वृत्तानुसार गोळीबारात दोघांचा मत्यू झाला असून सहा जण जखमीही झाले आहेत. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे. मात्र, या घटनेचा सामन्यांवर परिणाम झाला नाही. उद्घाटनाचा सामना निर्धारित वेळेत सुरू झाला. न्यूझीलँडचे पंतप्रधान क्रिस हिपकिंस यांनी या घटनेची माहिती सर्वांना दिली. ते म्हणाले की, हा दहशतवादी हल्ला नाही. राष्ट्रीय सुरक्षेला कोणत्याही धोक्याशी संबंधित बाब नाही. स्पर्धा त्याच्या वेळेवर सुरू होईल. नॉर्वे खेळाडूंच्या हॉटेलजवळ गोळीबार झाल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. खेळाडूंनी सोशल मीडियावर आपल्या प्रकृतीची माहिती दिली. गोळीबारानंतर शहरातील एक सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आला. एवढेच नाही तर इटालियन संघाचे सराव सत्रही उशिरा सुरू झाले.
गोळीबारानंतर खेळाडूंना हॉटेलमधून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचवेळी अमेरिकन दूतावासाने आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत माहिती दिली. उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस ऑकलंडमध्ये आहेत. कमला आणि त्यांचे पती डग्लस एमहॉफ सुरक्षित आहेत. यावेळी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँडमधील नऊ शहरांमध्ये १० मैदानांवर सामने खेळवले जाणार आहेत. महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण ६४ सामने खेळवले जाणार आहेत.