ट्विटरला अपेक्षित उत्पन्न मिळेना...
#सॅन फ्रान्सिस्को
जाहिराती निम्म्याने कमी झाल्याने ‘ट्विटर’चा रोख नफा घटला आहे. व्यवसायिक सल्ला देणाऱ्या ‘ट्वीट’ला दिलेल्या प्रत्युत्तरादाखल ‘ट्विटर’चे प्रमुख एलॉन मस्क यांनीच ही माहिती उघड केली आहे. ‘ट्विटर’च्या जाहिरातींच्या महसुलात सुमारे ५० टक्के घट झाली आहे. तसेच मोठ्या कर्जामुळे अजूनही रोख नफा न होता तोटा होत आहे.
‘ट्विटर’ ४४ अब्ज डॉलर मोजून ताब्यात घेतल्यापासून मस्क जाहिरातदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. या कंपनीतून मोठय़ा प्रमाणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवल्यानंतर जाहिरातदारांची चिंता वाढली आहे. ‘ट्विटर’ने पूर्वी प्रतिबंधित केलेले काही दिग्गज वापरकर्ते पुन्हा ‘ट्विटर’वर सक्रिय झाले आहेत. मस्क यांनी एप्रिलमध्ये स्पष्ट केले होते, की बहुतेक जाहिरातदार पुन्हा ‘ट्विटर’शी जोडले गेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे रोख उत्पन्न सकारात्मक असू शकेल. मे महिन्यात ‘ट्विटर’ने नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लिंडा याकारिनो यांना नियुक्त केले आहे. पण त्यानंतर ‘ट्विटर’ने काही वापरकर्त्यांना एका दिवसात किती ‘ट्विट’ पाहता येतील यावर मर्यादा घालून काही वापरकर्त्यांना नाराज केले आहे. ‘साइट’च्या बाहेर ‘लॉक’ केल्याची काहींची तक्रार आहे. त्यात भर म्हणून आता नवा प्रतिस्पर्धी मैदानात उतरला आहे. ‘फेसबुक’ची मालकी असलेली ‘मेटा’ने ‘ट्विटर’च्या धर्तीवर ‘अॅप थ्रेड्स’ आणले आहेत.