गुप्त फाइल्सबाबत ट्रम्प यांची ध्वनीफीत उघडकीस
#वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सिक्रेट फाइल्स आपल्या घरी नेल्याचा आरोप होता. त्यासंदर्भात आता एक ध्वनिफीत समोर आली आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतः निवडणूक हरल्यानंतर कागदपत्रे सोबत घेतल्याची कबुली दिली आहे. अमेरिकेतील मीडिया हाऊस सीएनएनने हा दावा केला आहे. ही ध्वनीफीत अमेरिकेच्या सरकारी वकिलांकडे आहे.
ध्वनीफितीबाबत ट्रम्प म्हणत आहेत की, 'त्यांनी इराणवरील हल्ल्याची माहिती असलेली संरक्षण खात्याची फाइल आपल्याकडे ठेवली होती. या ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे २०२४ची अध्यक्षीय निवडणूक लढवण्याची घोषणा करणाऱ्या ट्रम्प यांच्यासाठी आणखी अडचणी निर्माण होणार आहेत. बलात्कार आणि मानहानीच्या खटल्यात ते आधीच कोर्टाच्या चकरा मारत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रवक्ते स्टीव्हन चेउंग यांनी ऑडिओ लीकच्या प्रकरणावर प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, 'हे सर्व ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांना त्रास देण्यासाठी केले जात आहे. ही त्यांची राजकीय दडपशाही आहे. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. त्याचवेळी गुप्त फाइल्सची चौकशी करणाऱ्या न्याय विभागाने या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. न्याय विभागाने ऑगस्ट २०२२ मध्ये सांगितले की, ते ट्रम्प यांच्या गुप्त फाइल्स त्यांच्याकडे ठेवण्याच्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. २०२१ मध्ये सत्ता सोडताना ट्रम्प यांनी हजारो कागदपत्रे सोबत ठेवली होती. त्यापैकी ३०० वर्गीकृत म्हणजेच गुप्त कागदपत्रे आहेत.