‘ट्रम्प तर अमेरिकेचे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष’
#वॉशिंग्टन
अमेरिकेत अध्यक्षपदाची आगामी निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर जगातील सगळ्यात शक्तिशाली देशाचा प्रमुख कोण असणार, हे स्पष्ट होणार आहे. रिपब्लिकन पक्षाकडून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर सत्तारूढ डेमोक्रॅटिक पक्षाकडून ज्यो बायडेन हे परस्परविरोधात उभे राहणार हे जवळपास स्पष्ट झालेले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन आपापल्या पक्षातील विरोधकांपुढे आघाडी घेताना दिसत असून या दोघांमध्ये चुरशीची लढत होईल, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती पुढे आली असून आतापर्यंतच्या ४५ राष्ट्राध्यक्षांपैकी डोनाल्ड ट्रम्प हे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याचा निष्कर्ष त्यात हाती आला आहे. या यादीमध्ये ते सगळ्यात शेवटच्या स्थानावर आहेत, तर बायडेन हे १४व्या स्थानावर आहेत.
अमेरिकेतील राजकीय अभ्यासक जस्टिन वान आणि ब्रँडन रोटिंगहॉस यांनी सर्वेक्षण केले आहे. अमेरिकेमध्ये जे लोक यादवीयुद्ध थांबवण्यात किंवा देशाला संकटाच्या प्रसंगातून बाहेर काढण्यात अपयशी ठरले, त्यांच्या तुलनेतही ट्रम्प मागे पडले आहेत. सर्वे करणाऱ्या वान आणि ब्रँडन यांचं म्हणणं आहे की, बायडेन यांची सगळ्यात मोठी कामगिरी अशी आहे की, त्यांनी ट्रम्प यांच्या तावडीत अध्यक्षपद जाण्यामध्ये वाचवलं. विद्यमान अध्यक्षांनी पुन्हा पारंपारिक शैलीत काम करुन स्वतःला सिद्ध केलं आहे.
कोस्टल कॅरोलिना युनिव्हर्सिटीचे वॉन आणि ह्यूस्टन युनिव्हर्सिचे रोटिंगहॉस यांनी १५४ दिग्गजांचे सर्व्हेक्षण केले आहे. हे लोक अमेरिकन पॉलिटिकल सायन्स असोसिएशनशी संबंधित आहेत. सर्वेमध्ये ४५ अध्यक्षांचा समावेश करण्यात आलेला होता. २०१५ आणि २०१८ या वर्षातही असे सर्वे केला होते.
पसंतीचे पहिले तीन राष्ट्राध्यक्ष असे
आवडत्या राष्ट्राध्यक्षांमध्ये अब्राहम लिंकन पहिल्या स्थानावर आहेत. त्यांनी अमेरिकेतल्या गुलामगिरीवर मोठं काम उभं केलं होतं. यादवीयुद्धाच्या काळात त्यांनी सक्षमपणे देशाचं नेतृत्व केलं होतं. दुसऱ्या स्थानावर फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट आहेत. त्यांनी मंदी आणि दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचे नेतृत्व केल होते. तिसऱ्या स्थानावर जॉर्ज वॉशिंग्टन आहेत.