ट्रम्प यांची निक्की हेली यांच्यावर मात
#वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले असून अद्याप दोन्ही पक्षांचे उमेदवार नक्की झालेले नाहीत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली विजयी घौडदोड सुरूच ठेवली आहे. त्यांनी आपले पक्षातील प्रतिस्पर्धी उमेदवार निक्की हेली यांचा साऊथ कॅरोलिनामध्ये पराभव केला आहे. विशेष म्हणजे निक्की हेली यांचे साऊथ कॅरोलिना हे 'होम स्टेट' आहे. त्यामुळे हेली यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
रिपब्लिकन पक्षातील प्राथमिक पातळीवरील निवडणुका सुरू आहेत. यात डोनाल्ड ट्रम्प आणि निक्की हेली हे परस्पराचे तगडे स्पर्धक मानले जातात. डोनाल्ड ट्रम्प एक-एक पाऊल पुढे जात आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पच रिंगणात असतील हे नक्की. असे झाल्यास त्यांची अध्यक्षपदासाठी थेट लढत डेमोक्रॅट पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी लढत होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत चार राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. प्रत्येक विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प अधिक समर्थ होत आहेत. दुसरीकडे निक्की हेली यांनी ७७ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक तंदुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच दुसऱ्या वेळेस ट्रम्प निवडून आल्यास देशात अनागोंदी निर्माण होईल, असेही त्या म्हणाल्या आहेत.
२०१० मध्ये निक्की हेली या साऊथ कॅरोलिनामधील प्रसिद्ध मेअर होत्या. त्या एकमेव महिला उमेदवार रिपब्लिकन पक्षाकडून लढत आहेत. सध्या तरी त्यांना 'अमेरिका फस्ट' अजेंडा चालवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणे अवघड जात आहे. ट्रम्प यांच्यावर अनेक खटले भरण्यात आलेले आहेत. असे असले तरी उजव्या विचारसरणीच्या लोकांचा त्यांनाच सर्वाधिक पाठिंबा असल्याचं दिसत आहे.
अमेरिकेमध्ये नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी कंबर कसली आहे. सध्या त्यांच्या वाढलेल्या वयाची अमेरिकेत चर्चा सुरू आहे. असे असले तरी अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे.