संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा थॉमस मॅथ्यू क्रूक्स हा सराईत नेमबाज नसल्याचे आढळून आले असून त्याचे वडील रिपब्लिकन पक्षाचे नोंदणीकृत मतदार आहेत. विशेष म्हणजे उत्तम नेमबाज नसल्याने थॉमसला रायफल संघातून काढले होते. त्याने कोणत्या कारणाने गोळीबार केला हे अजून स्पष्ट झालेले नाही.
ट्रम्प जीवघेण्या हल्ल्यातून बचावले असून रविवारी पेनसिल्व्हेनियातील सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला. एक गोळी कानाला चाटून गेली असून ते जखमी झाले असले तरी त्यांच्या जिवाला कोणताही धोका नाही. गोळीबारानंतर अमेरिकेसह जगभरातून तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होत असलेल्या निवडणुकीवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने हल्लेखोराची ओळख पटवली असून २० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रूक्सने हा गोळीबार केला आहे. क्रूक्सने गोळीबार करताच सुरक्षा रक्षकांनी प्रतिहल्ला केला. यामुळे थॉमस क्रूक्सचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या स्टेजपासून अवघ्या १४० मीटर अंतरावरील एका छतावर क्रूक्स नेम धरून उभा होता. त्याच्याकडे एआर-१५ ही सेमी ऑटोमॅटिक रायफल होती. त्याच्या वडिलांकडे या रायफलचा परवानाही आहे. याच रायफलने त्याने गोळीबार केला. पेनसिल्व्हेनियामधील बेथेल पार्कमधील तो रहिवासी होता. तो यंदा पहिल्यांदाच ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करणार होता. त्याने २०२२ मध्ये बेथेल पार्क हायस्कूलमधून शिक्षण घेतलं असून तो अत्यंत हुशार आणि शांत मुलगा होता, असं रॉयटर्सने म्हटले आहे. त्याच्या शाळेतील शिक्षकांनी त्याचं वर्णन आदर्श विद्यार्थी असं केलं आहे. तो स्वतःमध्ये रमायचा, त्याने याआधी कधीही राजकीय भूमिका घेतल्याचं आठवत नाही, असंही ते म्हणाले.
एफबीआयने म्हटले आहे की, त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्येही प्रक्षोभक भाषेचा वापर नाही किंवा त्यांला मानसिक आरोग्याच्या तक्रारीचा कोणताही इतिहास सापडला नाही. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर हिंसाचार किंवा तत्सम प्रकारांना प्रोत्साहन देणारी कोणतीही पोस्ट नसल्यामुळे तपास अधिकारी त्याच्या राजकीय भूमिकेपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
एवढंच नव्हे तर तो उत्तम नेमबाज नसल्याने त्याला रायफल संघातूनही बाहेर काढण्यात आले होते, असे शालेय नेमबाज संघाच्या तत्कालीन कर्णधाराने सांगितले. त्याच्या एका वर्गमित्राने एका मुलाखतीत असेही सांगितले की, क्रूक्सला संगणक चालवणे, गेम खेळणे आदी आवड होती. सार्वजनिक नोंदीनुसार, त्याचे वडील नोंदणीकृत रिपब्लिकन आणि आई नोंदणीकृत डेमोक्रॅट आहे.
दरम्यान, हल्ल्यानंतर अध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमधून राष्ट्राला संबोधित केले असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. बायडेन म्हणाले, जे काही घडले त्याबद्दल आज मला तुमच्याशी बोलायचे आहे. एका माजी राष्ट्राध्यक्षावर गोळीबार झाला आणि हल्ल्यात एका अमेरिकन नागरिकाचा बळी गेला. हा नागरिक आपल्या पसंतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी तेथे जमला होता. अमेरिकेच्या इतिहासावर नजर टाकली असता हिंसा हे कोणत्याही प्रश्नावर उत्तर असू शकत नाही. त्यामुळे आपल्याला या रस्त्याने जायचे नाही. अमेरिकेत हिंसाचाराला स्थान नाही. तसेच हिंसेचे सामान्यीकरण आम्ही होऊ देणार नाही.
नागरिकांंनी शांतता राखावी आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. आपल्यात तीव्र मतभेद असू शकतील. निवडणुकीतून जनतेने केलेली निवड अमेरिका आणि संपूर्ण विश्वाचे पुढील काही दशकांचे भविष्य ठरविणार आहे. बायडेन यांनी सहा मिनिटांचे भाषण केल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. आपल्या भाषणात बायडेन यांनी एकसंघ राहण्यावर भर दिला. तसेच ६ जानेवारी रोजी राजधानीवर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला. देशात राजकारणाने टोक गाठले असल्यामुळे आता सर्वांनीच थोडे सबुरीने घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत माथेफिरूंकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्राध्यक्ष आणि पक्षाच्या अध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारांना लक्ष्य करून राजकीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अब्राहम लिंकन यांच्यासह चार अध्यक्षांची हत्या, तर तीन अध्यक्षांच्या हत्येचे प्रयत्न करण्यात आले आहेत.