ट्रम्प आणि बायडनही म्हणतात, 'मी पुन्हा येईन'
#वॉशिंग्टन
येत्या ५ नोव्हेंबर २०२४ रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुक होणार आहे. सत्ताधारी डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिग्गज या शर्यतीत उतरणार असून कुठल्याही परिस्थितीत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचा इरादा या दोघांनी पहिल्यापासून स्पष्ट केला आहे. या दोघांनाही पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याची ईच्छा आहे. या पार्श्वभूमीवर एका संस्थेने केलेल्या पाहणीत सध्यातरी हे दोनच उमेदवार जनतेत लोकप्रिय असल्याचे समोर आले आहे.
'लॅडब्रोक'च्या पाहणीनुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन (लोकप्रियता ३६.४ टक्के) व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (लोकप्रियता ३०.८ टक्के) हे सर्वाधिक आघाडीचे उमेदवार असतील. ट्रम्प याच्या उमेदवारीला पक्षातूनच मोठे आव्हान मिळणार आहे. तरीही ट्रम्प यांचे पारडे जड आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मारियानी विल्यमसन (अध्यात्मिक सल्लागार) व रॉबर्ट एफ केनेडी (लसीकरणाविरूद्ध मोहिमेचे नेते) या केवळ दोन नेत्यांनी निव़डणुकीत उतरण्याची आजवर घोषणा केली आहे. ट्रम्प याच्या विरूद्ध अनेक खटले चालू आहेत. त्यापैकी मारलागो या स्वतःच्या निवासस्थानी व्हाईट हाऊसमधील महत्वाचे गोपनीय कागदपत्र दडवून ठेवणे, आयकर चुकविणे, महिलांवर बलात्कार करणे व गेल्या निवडणुकीच्या वेळी स्वतःच्या समर्थकांना चिथावणी देऊन कॅपिटोवरील हल्ल्याला जाहीर चिथावणी देणे आदी प्रमुख आहेत. त्यातून ते सहीसलामत बाहेर आले, तरच त्यांना अमेरिकन मतदाराची साथ मिळेल.
बायडन अध्यक्ष झाले, तर विद्यमान धोरणे चालू राहतील. पण, ट्रम्प जिंकले की ते त्यांचा उरलेला अजेंडा अमलात आणण्याचा प्रयत्न करतील. त्यात ढोबळमानाने मेक्सिको सीमेवरील भिंतीचे काम पुरे करणे. तेथून येणाऱ्या स्थलांतरितांना कायमची बंदी करणे, आलेल्यांच्या कुटुंबियांसाठी जाचक नियम लागू करणे, देशांतर्गत `गन कल्चर’ला ( बंदूक संस्कृती) होणारा विरोध मोडून काढणे, मुस्लिम देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशाला प्रतिबंध करणे, अमेरिकेतील खनिज तेल संपत्तीचा उपयोग करणे, युरोपमधून नाटोखाली वावरणारे अमेरिकन सैन्य माघारी घेणे, युरोपच्या सुरक्षेची जबाबदारी झटकून टाकणे, युक्रेनला केला जाणारा शस्त्रास्त्र पुरवठा बंद करणे, थोडक्यात, युक्रेनला वाऱ्यावर सोडणे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मैत्री करणे, चीनला जाचक ठरतील, अशी धोरणे जाहीर करणे, श्रीमंतांसाठी करात सूट देणे, पृथ्वीचे तपमान घटविण्यासाठी होणाऱ्या जागतिक प्रयत्नांना खीळ घालणे इ.कामांना प्राधान्य दिले जाईल. 'अमेरिका फर्स्ट’ या घोषणेला प्राधान्य मिळेल व राष्ट्रवादाचे पुनरूज्जीवन होईल. परिणामतः अमेरिकेत वंशवाद वाढण्याची शक्यता अधिक आहे.