'खून का बदला खून'
#कीव्ह
रशियन सैन्याने एका युक्रेनियन सैनिकाची ऑनकॅमेरा हत्या केल्याचा एक व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ पाहून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की संतापले आहेत. या व्हीडीओमधल्या सैनिकाच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्याची शपथ झेलेन्स्की यांनी घेतली आहे.
व्हीडीओमध्ये, रशियन सैनिकांच्या ताब्यात असलेला एक युक्रेनियन सैनिक खंदकात सिगारेट ओढताना दिसत आहे. सिगरेट ओढताना त्याने 'स्लावा युक्रेनी' अशी घोषणा दिल्यामुळे रशियन सैनिक संतापले. त्यावर त्याने कॅमेरासमोरच्या सैनिकांवर गोळ्यांचा मारा केला. व्हीडीओत, शूट करणारा रशियन सैनिक असल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनियन लष्कराच्या ३० व्या अत्याधुनिक तुकडीने मंगळवारी या सैनिकाचे नाव 'टायमोफी मायकोलायोविच शादुरा' असे असल्याचे म्हटले आहे. ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार, हा सैनिक शादुरा तुकडीचा भाग होता आणि बखमुतजवळ लढल्यानंतर ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. या सैनिकाचा मृतदेह युक्रेनच्या तुकडीच्या ताब्यात आला आहे. त्याचा मृतदेह हाती आल्यावर या सैनिकाची ओळख पटेल, असेही या ब्रिगेडने सांगितले आहे.
हा व्हीडीओ पाहून झेलेन्स्की म्हणाले की, रशियन आक्रमणकर्त्यांनी एका शूर जवानाला किती क्रूरपणे मारले आहे ते पहा, या सैनिकाने धैर्याने युक्रेनचा गौरव केला होता. त्यांनी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करून सांगितले की, आपण सर्वांनी एकजुटीने प्रतिसाद द्यावा, अशी माझी इच्छा आहे.
आम्ही मारेकऱ्यांना शोधू, अशी शपथ घेतो, असेही झेलेन्स्की म्हणाले. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी हा व्हीडीओ हे युद्ध नरसंहाराचा आणि घृणास्पद युद्ध गुन्ह्याचा आणखी एक पुरावा आहे, असे सांगत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाकडून तत्काळ तपास करण्याची मागणी केली आहे.
वृत्तसंंस्था