पाकिस्तानवर चीनसमोर हात पसरण्याची वेळ
#इस्लामाबाद
सगळ्या अटी मान्य करून अद्यापही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला एक पैशाचेही कर्ज दिलेले नाही. त्यामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आता चीनसमोर हात पसरण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. मागच्या तीन महिन्यांपासून पाकिस्तान आणि आयएमएफमध्ये केवळ वाटाघाटीच सुरु आहेत. पाकिस्तान सरकारकडे नित्याचा खर्च भागवण्यासाठी पैसे उरलेले नाहीत. मागच्या सहा महिन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारी थकलेल्या आहेत. त्यात माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानी लष्करात संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शाहबाज शरीफ यांची अवस्था अधिकच केविलवाणी झाली आहे.
इम्रान खान आणि पाकिस्तानी लष्कराच्या संघर्षात कोणतीही ठोस भूमिका घेऊ न शकलेल्या शरीफ सरकारला आर्थिक नड भागवण्यासाठी चीनसमोर हात पसरावा लागणार आहे. आयएमएफशी वाटाघाटी सुरु असल्याने पाकिस्तानने सुरुवातीला चीनकडून कर्ज घेण्याचा पर्याय टाळला होता. कारण पाकिस्तानने यापूर्वी अनेकवेळा चीनकडून कर्ज घेतलेले आहे, ते अद्याप फेडले नाही. त्यात चीनचा व्याजदर इतरांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे जर आयएमएफ कर्ज देणार असेल तर चीनकडे जाण्याची गरज भासणार नाही, असा ठोकताळा मनात बांधत शाहबाज शरीफ यांनी आयएमएफच्या सगळ्या अटी मान्य केल्या आहेत. मात्र तरीही आयएमएफने पाकिस्तानला एक पैशाचे कर्ज दिलेले नाही. पाकिस्तान सरकारने आयएमएफकडे ६.५ अब्ज डॉलरचे कर्ज द्यावे, असा प्रस्ताव पाठवलेला आहे. मात्र आयएमएफने यांचा हा प्रस्ताव मान्य केलेला नाही. इकडे इम्रान खान आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संघर्षामुळे अमेरिकेने पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पाकिस्तानला नव्याने कर्जच मिळणे कठीण झाले आहे.
कर्ज घ्या अन्यथा...
पाकिस्तान सरकारकडे आता दोन प्रांतातील निवडणूक घेण्यासाठी निधी नाही, त्यात इमरासन खान यांची लोकप्रियता वाढत असल्याने जनतेसाठी अनुदान देणे भाग आहे. आयएमएफने सगळी अनुदाने बंद करण्याचा आग्रह धरला धरला आहे. अशा पेचात अडकलेल्या शाहबाज शरीफ सरकारसमोर चीनकडून कर्ज घेण्याच्या एकमेव पर्याय उरला आहे. पाकिस्तान सरकारने त्वरित चीनकडून कर्ज घ्यावे आणि आर्थिक संकटावर मात करावी, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. जर पाकिस्तान सरकारने कर्ज घेतले नाही पाकिस्तानात गृहयुद्ध भडकण्याची शक्यता असल्याचा इशाराही अभ्यासकांनी दिला आहे.
वृत्तसंस्था