पाकिस्तानमध्ये कबरींनाही कुलूप लावण्याची वेळ
#लाहौर
आर्थिक दिवाळखोरी आणि नागरी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील महिला सुरक्षिततेचा मुद्दा अलीकडे काहीसा दुर्लक्षित राहिला होता, मात्र एका पाकिस्तानी लेखकाच्या ट्विटमुळे महिला सुरक्षिततेबाबतचे वास्तव समोर आले आहे. आपल्या मृत मुलीवर बलात्कार होऊ नये यासाठी एका पालकाने तिच्या कबरीला कुलूप लावून ठेवल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानात घडली आहे. या प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कौटुंबिक मूल्यांचा मोठा अभिमान असलेल्या पाकिस्तानसारख्या देशात दर दोन तासांनी एका महिलेवर बलात्कार होतो. पण मृत मुलींच्या कबरीवरील कुलूप ही माणुसकीला काळीमा फासणारी आणि समाजाला मान खाली घालायला लावणारी गोष्ट असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार, देशातील ४० टक्के महिलांना जीवनात एकदा तरी अन्याय सहन करावा लागतो. घराबाहेर बुरखा सक्तीचा असलेल्या या देशातील महिलांना कुटुंबातील सदस्यांच्या वासनेला बळी पडावे लागत असल्याचेही आयोगाच्या अहवालात नमूद केलेले आहे.
'देवाचा शाप, मी इस्लाम का सोडला' या पुस्तकाचे लेखक असलेल्या आणि मुस्लीम धर्म सोडलेल्या हॅरिस सुलतान यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. त्यांनी हा फोटो ट्वीट करत लिहिले आहे की, पाकिस्तानने एक असा खडबडीत, लैंगिकदृष्ट्या निराश समाज निर्माण केला आहे की, लोक आता आपल्या मृत मुलींवर बलात्कार होऊ नयेत म्हणून त्यांच्या थडग्यांवर टाळे लावत आहेत. जेव्हा तुम्ही बुरख्याचा संबंध बलात्काराशी जोडता तेव्हा तो तुमच्या मागे थडग्यात जातो, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान पाकिस्तानमधील वस्तुस्थिती ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर आणल्याने सुलतान यांच्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र पाकिस्तान आणि जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी ही वस्तुस्थिती समोर येण्याची गरज व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये अशा अनेक कबरींना टाळे लावण्याचे प्रकार सुरू असल्याचे अनेकांनी कबूल केले आहे.वृत्तसंस्था