दात कोरून पोट भरण्याची पाकवर वेळ
#इस्लामाबाद
आर्थिक संकटाने ग्रस्त असलेल्या पाकिस्तानला भिकेचे डोहाळे कधीच लागलेले होते. त्यातूनही हाती काही लागत नसल्याने आता दात कोरून पोट भरण्याची वेळ आलेली दिसते. यामुळे देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान, लष्करप्रमुख, विविध मंत्री, मान्यवर विविध देशांच्या भेटीवर असताना त्यांना मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटवस्तूंच्या लिलावातून येणाऱ्या रकमेचा वापर गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी केला जाणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीच ही घोषणा केली आहे.
मायदेशी आल्यावर देशातील मान्यवर त्यांना मिळालेल्या भेटवस्तू तोशाखान्यात म्हणजे सरकारी खजिन्यात ठेवतात. याच भेटवस्तूंचा लिलाव करून यातून मिळणाऱ्या रकमेचा वापर गरिबांच्या मदतीसाठी केला जाणार आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, आम्ही तोशाखान्यातील भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून जमा होणारा पैसा अनाथ मुले, रुग्णालये, शिक्षण संस्था, कल्याणकारी संस्था आणि गरजूंना मदत करण्यासाठी वापरला जाणार आहे.
तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खान यांनी पंतप्रधान असताना विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू विकल्या होत्या. या सर्व भेटवस्तू त्यांनी तोशाखान्यातून सव्वा दोन कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्याची विक्री केल्यावर त्यांना ५ कोटी ८० लाख रुपये मिळाल्याचे आधी स्पष्ट झाले होते. त्यानंतर ही रकम २० कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.
तोशाखानाप्रकरणी न्यायालयाने अलीकडेच निकाल देताना इम्रानखान यांना दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने त्यांना एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यानंतर लाहोर पोलिसांनी पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाचे अध्यक्ष असलेल्या इम्रान खान यांना त्यांच्या लाहोरमधील जमान पार्क येथील घरातून अटक केली. नंतर त्यांना इस्लामाबादला आणण्यात आले. पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्षाने हे तोशाखाना भेट प्रकरण निवडणूक आयोगाकडे उपस्थित केले होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी अबरार खालिद नावाच्या पाकिस्तानी नागरिकाने माहिती आयोगाकडे अर्ज दाखल केला होता. पाकिस्तानातील कायदेशीर तरतुदीनुसार ४ लाखांपेक्षा जास्त किमतीची भेटवस्तू असेल तर फक्त वजीर-ए-आझम (पंतप्रधान) किंवा सदर-ए-रियासत (राष्ट्रपती) यांनाच ती खरेदी करता येते. जर कोणी खरेदी केले नाही तर भेटवस्तूंचा लिलाव होतो.
इम्रान यांनी पदाचा गैरवापर करत २ कोटींची भेट कुठे ५ लाख तर कुठे ७ लाख अशी दाखवली. या किमतीत भेटवस्तू खरेदी करून नंतर मूळ किमतीपेक्षा कितीतरी अधिक पटीने त्यांची विक्री केली. हे काम फराह खान उर्फ फराह गोगी या जुल्फी बुखारी आणि बुशरा बीबी यांच्या मित्राने केले होते. बुशरा बीबी या इम्रानखान यांच्या तिसऱ्या पत्नी होत.
आणखी एक खास गोष्ट म्हणजे फराह गोगी एका खासगी जेटने पाकिस्तानातून पळून गेली. ज्या दिवशी इम्रान खान यांचे सरकार पडले त्याच दिवशी म्हणजे १० एप्रिल २०२२ ला ती दुबईला पोहोचली. तोशाखाना प्रकरण दोन प्रकारे सुरू आहे. या प्रकरणी बुशरा बीबी यांनाही १३ वेळा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली. मात्र त्या एकदाही हजर झाल्या नाहीत.
वृत्तसंस्था