हा तुरुंग आहे पृथ्वीवरचा नरक
#जकार्ता
पृथ्वीवरील स्वर्ग जर कुठे असेल तर तो काश्मीरमध्ये असल्याचे मानले जाते, मग नरक कुठे या प्रश्नाला उत्तर द्यायचे झाले तर लोक इंडोनेशियातील एका तुरुंगाचे नाव घेतात. केरोबोकन कारागृह हे जमिनीवरील नरकाचे दुसरे नाव आहे. जगभरातील सर्वात वाईट कारागृहांपैकी हा एक मानला जातो. विशेष म्हणजे या तुरुंगातील सगळे कैदी शिक्षा भोगण्यासाठी जिवंत ठेवण्यात आलेले नाहीत. ते केवळ आपल्याला कधी गोळ्या घालून ठार करण्यात येणार आहे, याची वाट पाहात दिवस काढत असतात.
इंडोनेशियात अमली पदार्थांची तस्करी हा सर्वाधिक गंभीर गुन्हा मानण्यात येतो. या गुन्ह्यासाठी तिथे केवळ मृत्युदंडाचीच शिक्षा देण्याची तरतूद आहे. गुन्हेगाराला या तुरुंगात आणण्यात येते. तिथे अशा गुन्हेगारांना गोळ्या घालून मृत्युदंड दिला जातो. ही शिक्षा देण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तैनात करण्यात आले. या पथकावर ही कामगिरी सोपवलेली आहे. मात्र या पथकातील उपलब्ध मनुष्यबळ आणि केरोबोकन कारागृहात शिक्षेसाठी आणले गेलेल्या गुन्हेगारांची संख्या व्यस्त प्रमाणात आहे. त्यामुळे शिक्षेसाठी आणण्यात येणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित शिक्षा होत नाही. तोपर्यंत हे गुन्हेगार गोळ्या घालण्याची वाट बघत दिवस काढत असतात. या तुरुंगात केवळ इंडोनेशियाचेच कैदी आहेत असे नाही. अमली पदार्थांचे जगभरातील ख्यातनाम तस्कर या तुरुंगात आणण्यात आले आहेत. त्यांची शिक्षाही ठरलेली आहे. लिंसडे सॅंडिफोर्ड ही ब्रिटनची कुख्यात ड्रग तस्कर याच कारागृहात मरणाची वाट बघत दिवस कंठत आहे. २०१३ साली तिला १.६ दशलक्ष पौंड किमतीच्या अमली पदार्थांची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.
वृत्तसंस्था