‘भारतासारखा दमदार मित्र नाही’
#वॉशिंग्टन
जागतिक राजकारणात भारत अनन्यसाधारण भूमिका पार पाडू शकतो. त्यामुळे येत्या काळात भारताशिवाय जागतिक राजकारण शक्य नाही. जागतिक शांतता आणि विकासाच्या प्रक्रियेत भारतासारख्या मित्र देशाची गरज असल्याचे सांगत अमेरिकेच्या बायडन प्रशासनाने भारतावर स्तुस्तिसुमने उधळली आहेत.
भारतासारखा मित्र देश जगात अन्य नसल्याचेही बायडन प्रशासनाने नमूद केले आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणाला पायबंद घालण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज असल्यानेच आता भारताच्या सहकार्याची नितांत गरज भासत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी (२१ जून ते २४ जून) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन प्रशासनाने भारतावर स्तुतिसुमने उधळली आहेत. २२ जूनच्या रात्री राष्ट्राध्यक्ष बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी त्यांच्यासाठी शाही स्नेहभोजन आयोजित केले आहे. २०१४ ला पहिल्यांदा पंतप्रधान झालेले मोदी त्यानंतर अनेक वेळा अमेरिकेत जाऊन आलेले आहेत. मात्र अमेरिकेकडून खास निमंत्रण येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या ज्यो बायडन यांनी मात्र मोदींसोबत तसे उशिरा जुळवून घेतले आहे. मोदी-ट्रम्प यांच्या संबंधांमुळे बायडन सुरुवातीच्या काळात मोदींशी थोडे अंतर राखूनच वागल्याचे दिसलेले आहे.
मात्र आता चीनच्या विस्तारवादी धोरणाची धास्ती घेतलेल्या बायडन यांनी भारताशी आणि मोदींशी जुळवून घ्यायला सुरुवात केली आहे. रशियासोबत भारताचे मैत्रीपूर्वक संबंध आहेत. याशिवाय मोदी यांनी इस्लामिक देशांशीही स्वतंत्ररीत्या उत्तम संबंध प्रस्थापित केले आहेत. जर्मनी, जपान, इंग्लंड आदी देशांशी असणारे संबंध वृद्धिंगत करण्याचा भारताचा प्रयत्न राहिला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका मात्र सध्या एकाकी पडत चालली आहे. आर्थिक मंदी अथवा परराष्ट्र धोरणात आजवर अमेरिकेची री ओढणारे युरोपियन युनियनचे सदस्य देशही चीनशी स्वतंत्रपणे संबंध ठेवत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हे त्याचे ताजे उदाहरण आहे. अशावेळी चीनला रोखायचे असेल तर चीनशी आशियात आर्थिक स्पर्धा करू शकणारा देश म्हणून बायडन यांना भारत महत्त्वपूर्ण वाटत आहे.
भारतासोबत व्यापार ही काळाची गरज
बायडन प्रशासनाच्या अधिकृत विधानाशिवाय अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनीही भारतासोबतच्या आर्थिक सहकार्य आणि व्यापारी संबंधांबाबत वक्तव्य केले आहे. भारत-अमेरिका संबंध हे दोन मोठ्या लोकशाही देशांतील संबंध आहेत. मागच्या वर्षी या दोन्ही देशांतील व्यापारी उलाढाल विक्रमी १९१ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. अमेरिकी कंपन्यांनी भारतात ५४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्याचे ब्लिंकन म्हणाले आहेत. त्यामुळेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबद्दल बायडन प्रशासनाशिवाय सर्वसामान्य जनतेतही मोठी उत्सुकता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
मैत्री, विश्वास आणि आदराची भावना
नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी खास निमंत्रण दिलेले तिसरे भारतीय नेते ठरले आहेत. अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणारे मोदी हे भारताचे एकमेव पंतप्रधान ठरले असल्याची भावना अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजित संधू यांनी व्यक्त केली आहे. भारतीय लोकांसाठी अमेरिका हे त्यांचे दुसरे निवासस्थान आहे. भारत आणि अमेरिकेतील सर्वसामान्य जनतेत परस्परांबद्दल आदर, मैत्री आणि विश्वासाची भावना असल्याचे वॉशिंग्टन येथील अमेरिका-भारत व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अतुल कश्यप यांनी व्यक्त केली आहे.
वृत्तसंस्था