तर मग अणुबॉम्ब विका अन कर्ज फेडा

डोक्यावरील कर्ज आणि नित्याचा खर्च चालवण्यासाठी पाकिस्तान सरकारकडे पैसे नाहीत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि मित्र देश मदत करायला तयार नाहीत. निधी नसल्याने न्यायपालिकेने आदेश देऊनही निवडणुक घेता येत नाही, अशा कोंडीत सापडलेल्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारला आयएसआय (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) या पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेनेच पैसे उभारण्याचा मार्ग दाखवला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 8 Jun 2023
  • 07:48 am
तर मग अणुबॉम्ब विका अन कर्ज फेडा

तर मग अणुबॉम्ब विका अन कर्ज फेडा

दिवाळखोर पाकिस्तानला दिला आयएसआयच्या तज्ज्ञाने सल्ला, २० अब्ज डॉलरचा निधी मिळवण्याचा एकमेव मार्ग

#इस्लामाबाद

डोक्यावरील कर्ज आणि नित्याचा खर्च चालवण्यासाठी पाकिस्तान सरकारकडे पैसे नाहीत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि मित्र देश मदत करायला तयार नाहीत. निधी नसल्याने न्यायपालिकेने आदेश देऊनही निवडणुक घेता येत नाही, अशा कोंडीत सापडलेल्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारला आयएसआय (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) या पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेनेच पैसे उभारण्याचा मार्ग दाखवला आहे. पाकिस्तानला पैसे मिळवायचे असतील आपल्याकडील शस्त्रास्त्रांची  विक्री करावी लागेल. त्यातही पाकिस्तान अणुबॉम्ब विकावेत अन कर्ज फेडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.  

आयएसआयचे संरक्षणतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक जैद हमीद यांनी पाकिस्तान सरकारला हा सल्ला दिला आहे. आर्थिक संकटावर मात करायची असेल तर पाकिस्तान सरकारला काहीतरी ठोस निर्णय घेणे भाग आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला कर्ज देण्याच्या नावाखाली खेळवत आहे. पाकिस्तानचे मित्र देशही पाकिस्तानला नव्याने कर्ज द्यायला तयार नाहीत, अशा अवस्थेत आपल्याकडील आण्विक बॉम्ब विकून पैसे उभारण्याशिवाय पाकिस्तानसमोर अन्य पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. पाकिस्तानने सौदी अरब आणि तुर्कस्तानला अणुबॉम्ब विकावेत आणि पैसे मिळवावेत, असा सल्ला जैद यांनी दिला आहे.

एवढा निधी जमवता येईल

पाकिस्तान सरकारला आपले आर्थिक दारिद्र्य संपवायचे असेल अणुबॉम्ब विकण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे बजावताना जैद यांनी अणुबॉम्ब विक्री आणि त्यातून मिळणाऱ्या मोबदल्याचा फार्म्युलाही स्पष्ट केला आहे. सौदी आरबीला ५ अणुबॉम्ब विकून पाकिस्तान सरकारला तासाभरात २५ अब्ज डॉलरची रक्कम उभी करता येईल. तसेच ५ अणुबॉम्ब तुर्कस्तानला विकून २० अब्ज डॉलरची रक्कम उभी करता येणार आहे. आपले अणुबॉम्ब विकण्यासाठी पाकिस्तान सरकारसमोर कसलीही आडकाठी येणार नाही. पाकिस्तानने अण्वस्त्र प्रसार प्रतिबंधक कायद्यावर स्वाक्षरी केलेली नाही, त्यातही पाकिस्तानने चोरून हे अणुबॉम्ब बनवले आहेत, लिबिया आणि तुर्कस्तानला आमचे हे अणुबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञानही विकत घ्यायचे आहे. भारत त्यांच्या मित्रदेशांना क्षेपणास्त्र विकून पैसे मिळवू शकतो तर आम्ही मुस्लीम देशांना अणुबॉम्ब विकून पैसे का उभारू शकत नाही? असा सवाल जैद यांनी उपस्थित केला आहे. 'घोरी'  आणि 'गझनी' विकून पाकिस्तान कर्जापेक्षा जास्त रक्कम उभी करू शकतो. त्यामुळे पाकिस्तानने अणुबॉम्ब विकून पैसे उभारण्याचा पर्याय अंमलात आणावा, असा आग्रह जैद यांनी धरला आहे.

कोण आहेत जैद हामिद ?

पाकिस्तानच्या सरकारवर वर्चस्व गाजवणाऱ्या 'आयएसआय' या गुप्तचर संस्थेचे ब्रेन अशी जैद हामिद यांची ओळख आहे. याशिवाय भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांत त्यांची गणना होते. विशेष म्हणजे हे जैद भारताला नेहमीच अणुबॉम्ब टाकण्याच्या धमक्या देत असतात. जगातील ५०० प्रभावशाली मुस्लीम व्यक्तींच्या यादीतही जैद यांचा समावेश होतो. नुकतेच माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी जैद हामिद यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढत जैद यांना बडवले होते, त्यावेळी ते पुन्हा प्रकाशझोतात आले होते.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest