वायफाय राउटर ठेवतोय हालचालींवर लक्ष
#न्यूयॉर्क
भारतात हेरगिरी करण्याचा चिनी ड्रॅगनचा आणखी एक डाव उघड झाला आहे. यापूर्वी मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून भारतीयांची माहिती चोरण्याचा प्रयत्न चीनने केला आहे. आता थेट घरातील वायफाय राउटरचा वापर करून चीन आपल्यावर लक्ष ठेवत असल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे तुमच्या घरात जर असं राउटर असेल तर वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिनी हॅकर्स राउटरमध्ये धोकादायक मालवेअरचा समावेश करत आहेत. या मालवेअरमुळे राउटर पूर्णपणे हॅकर्सच्या ताब्यात जाते. त्यानंतर या राउटरला कनेक्ट असलेल्या डिव्हाईसमधील माहिती हॅकर्सना मिळू शकते. 'चेक पॉईंट' नावाच्या संस्थेने केलेल्या संशोधनातून या हॅकिंगबद्दल माहिती समोर आली आहे.
या अहवालात सांगितल्यानुसार, टीपी लिंक कंपनीचे वायफाय राउटर अशा प्रकारच्या हॅकिंगला सर्वाधिक बळी पडत आहेत. यासोबत अन्य कंपन्यांच्या राउटरनाही हॅकिंगचा धोका असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अशा प्रकारच्या कारवाया करण्यासाठी चिनी हॅकर्सना सरकारचा पाठिंबा असल्याचा दावा चेक पॉईंटच्या अहवालात करण्यात आला आहे.
दरम्यान अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांपासून बचावासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तुमच्या राउटरचे सॉफ्टवेअर हे वेळोवेळी अपडेट करत राहा. ज्यामुळे, तुमचा राउटर नवीन मालवेअर्सना रोखू शकेल. तसेच, नवीन राउटर घेतल्यानंतर त्याचे लॉग-इन क्रेडेंशिअल हे लवकरात लवकर बदलणे आणि एक चांगला पासवर्ड वापरणे गरजेचे असल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.