चीनमध्ये वाढलाय नोकरी सोडण्याचा 'ट्रेंड'
#लियाओनिंग
एकीकडे भारतात बेरोजगारी वाढली असल्याची चर्चा असताना चीनमध्ये नोकऱ्या सोडण्याचा 'ट्रेंड' वाढला असल्याची माहिती समोर आली आहे. भारतापेक्षा मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या असूनही चीनमधील युवक-युवती मोठ्या प्रमाणात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून छोटे-मोठे व्यवसाय सुरू करत असल्याचे चित्र आहे.
स्वयंरोजगाराकडे वळणाऱ्यांत युवक-युवतींसोबतच मध्यमवयीन महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. सुरक्षित अशी नोकरी सोडून लोक मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे व्यवसाय सुरू करत आहेत. यात कोणी खाद्यपदार्थाचे केंद्र सुरू केले आहे तर कोणी ब्यूटी पार्लर सुरू केले आहे. विशेष म्हणजे पूर्वी कार्यालयात बौद्धिक काम करणारे युवक-युवती शारीरिक श्रम करावे लागणाऱ्या व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये आर्थिक मंदीमुळे नोकरकपात केली जात आहे. तिथे लोक आहे ती नोकरी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर याउलट भारतात लोकांना पात्रतेप्रमाणे काम मिळत नसल्याची समस्या आहे. अशीच परिस्थिती चीनमध्ये असताना लोकांना नोकरी सोडून स्वयंरोजगाराकडे वळावे वाटत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चीनमध्ये बहुतांश युवक सोशल मीडियावर सक्रिय असतात, या माध्यमाचा वापर करून आपल्या छोट्या उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे.