सिंगापूरच्या सभापतींनी दिला राजीनामा
#सिंगापूर
विवाहबाह्य संबंधांमुळे राजकीय नेत्याला शिक्षा झाल्याचे अथवा त्याच्या राजकीय भवितव्यावर काही परिणाम झाल्याचे उदाहरण भारतात दुर्मिळ असले तरीही सिंगापूरमध्ये सार्वजनिक जीवनात नितीमत्ता पाळली जाते. सिंगापूरचे विद्यमान सभापती टॅन चुआन जीन आणि महिला खासदार चेन ली हुई या दोघांना आपले सोडावे लागले आहे.
सिंगापूरच्या संसदेचे सभापती टॅन चुआन जीन यांना तर सभापतीपद, संसद सदस्यत्व आणि सत्ताधारी पीपल्स ऍक्शन पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडावे लागले आहे. तर टॅन चुआन जीनसोबत शारीरिक संबंध ठेवल्यामुळे महिला खासदार चेन ली हुई यांना संसद सदस्य म्हणून राजीनामा द्यावा लागला असून पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. पक्षाची शिस्त, देशातील घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि व्यक्तिगत आचरणाची परंपरा लक्षात घेत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सत्ताधारी पीपल्स ऍक्शन पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
जेसिका टॅन प्रभारी सभापती
सभापती टॅन चुआन जीन आणि खासदार चेन ली हुई यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांना देताना सिंगापूरचे पंतप्रधान ली हसायन लुंग यांनी, जीन यांच्या राजीनाम्यांनंतर सभापतिपदाची जबाबदारी उपसभापती जेसिका टॅन यांच्यावर सोपवण्यात आल्याची घोषणा केली आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी नव्या सभापतींची निवड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
व्यक्तिगत चारित्र्य महत्त्वाचे...
सभापती सभापती टॅन चुआन जीन हे विवाहित असून दोन मुलांचे पिता आहेत. मागच्या सहा महिन्यांपासून त्यांचे चेन ली हुईशी शारीरिक संबंध असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील बातम्याही काही वृत्तपात्रांनी प्रकाशित केल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वीच मी सभापतींना हे संबंध थांबवण्याची सूचना केली होती. मात्र तरीही त्यांनी हे प्रकरण थांबवले नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. शेवटी लोकप्रतिनिधींचे व्यक्तिगत चारित्र्य ही गोष्ट महत्त्वाची आहे. जनता निवडून देते म्हणून तुम्ही मोठ्या पदावर विराजमान होता. एकदा त्या पदावर विराजमान झालात म्हणून तुम्ही नितीमत्तेला तिलांजली देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान ली हसायन लुंग यांनी व्यक्त केली आहे.